जळगाव : सोशल मीडियावर विनापरवानगी जाहिरात केल्याबद्दल जळगाव व रावेर मतदार संघातील सात उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्या आहेत. यात गुलाबराव देवकर, उन्मेष पाटील, रक्षा खडसे यांचाही समावेश आहे.निवडणूक लढविणाºया प्रत्येक राजकीय पक्ष व इतरही निवडणूक लढविणाºया उमेदवारांनी निवडणुकीसंदर्भात प्रचारासाठी एसएमएस, जाहिरात व इतर प्रसिद्धीबाबत माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीची (एमसीएमसी) पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या पूर्वीच उमेदवारांना कळविण्यात आले आहे.असे असले तरी जळगाव मतदार संघातील चार व रावेर मतदार संघातील तीन उमेदवारांनी परवानगी न घेता सोशल मीडियावर जाहिरात केल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सातही नोटीस बजावण्यात आल्या आहेत.जळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी विनापरवानगी एका बेवसाईटवर जाहिरात केली असल्याचे नोटिसमध्ये म्हटले आहे. या व्यतिरिक्त जळगाव लोकसभा मतदार संघातीलच भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर, बहुजन मुक्ती पार्टीचे ईश्वर मोरे तर रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे, राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीचे उमेदवार अजित तडवी, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे उमेदवार रोहिदास अडकमोल या सर्वांनी फेसबुकवर विनापरवानगी जाहिरात केल्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.या संदर्भात तत्काळ परवानगी घ्यावी अन्यथा सदरचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येईल, असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
सोशल मीडियावर विनापरवानगी जाहिरात केल्याबद्दल सात जणांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:41 PM