लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अधिकारात बसत नसतानाही बाह्य रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याने एरंडोल, भुसावळ, पहूर व कजगाव येथील चार डॉक्टरांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी नाेटीस बजावली आहे. यात एरंडोल येथील शहा हॉस्पिटलचे डॉ. जाहीद शहा, भुसावळ येथील मुस्कान हॉस्पिटलचे डॉ. तौसिफ खान व कजगाव ता. भडगाव येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. निखील बोरो आणि पहूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. सचिन भडांगे पहूर यांचा समावेश आहे. दोन दिवसात खुलासा सादर न केल्यास कोविडची मान्यता रद्द करण्याचा इशारा या डॉक्टरांना देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. आवश्यक त्या रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नसल्याची परिस्थिती असताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबत काही निकष घालून दिले आहेत. दरम्यान, यानुसार इंजेक्शन देण्र्याचे अधिकार हे फिजिशियन किंवा इन्टेसिव्हीस्ट यांना असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. एकिकडे कोविड रुग्ण वाढत असताना या इंजेक्शनचा बाह्य रुग्णांसाठी वापर केल्याचे निदर्शनास आले असून तुटवड्यासाठी आपणास जबाबदार का धरू नये, असा सवालही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी नोटिसीत उपस्थित केला आहे. या चारही डॉक्टरांकडून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. खुलासा सादर न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल व आपल्या रुग्णालयाची कोविडची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.