जळगाव : कोरोनाकाळात रुग्णालयांसाठीचे नियम मोडल्यामुळे भुसावळचे समर्पण हॉस्पिटल आणि रिदम हॉस्पिटल यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी नोटीस बजावली आहे, तर रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी सारा हॉस्पिटललाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना खुलासा करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
जळगाव शहरातील सारा हॉस्पिटलमध्ये प्रतिभा कैलाससिंग परदेशी, रा. सावदा या महिलेचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ही घटना गंभीर स्वरूपाची असून, त्याचा संपूर्ण लेखी सविस्तर खुलासा दोन दिवसांच्या आत कार्यालयात सादर करावा, तसे न केल्यास आपणावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येईल, अशी नोटीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी बजावली आहे.
रिदम कोविड केअर सेंटर, भुसावळला वैद्यकीय अधीक्षकांनी भेट दिली. तेव्हा तेथे काही त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार या रुग्णालयालादेखील नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात व्हेटिंलेटर सॅक्शन असल्याप्रमाणे उपलब्ध नव्हते. ऑक्सिजनचा प्रमाणाबाहेर वापर, अग्निशमन यंत्रणेचे योग्य व्यवस्थापन नसणे, तपासणीच्या वेळी फक्त एकच डॉक्टर उपस्थित होते तसेच शासकीय दरपत्रकानुसार रुग्णांची फी आकारणी केलेली नव्हती. अशा त्रुटी आढळून आल्या आहेत. या केअर सेंटरलादेखील दोन दिवसांत खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.
भुसावळ येथील समर्पण हॉस्पिटलमध्येदेखील त्रुटी आढळून आल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी भेट दिली तेव्हा तेथे नोंदणीकृत नसलेले डॉक्टर रुग्णसेवा देत होते. स्टाफमधील एकाही व्यक्तीने पीपीई किट घातली नव्हती. ऑक्सिजनचा प्रमाणापेक्षा जास्त वापर, अग्निशमन यंत्रणेचे योग्य व्यवस्थापन नव्हते. बायोमेडिकल वेस्टचे व्यवस्थापन व्यवस्थित केलेले नव्हते. अस्वच्छता, रुग्णांच्या प्रकृतीची माहिती नातेवाइकांना वेळोवेळी दिली जात नाही, अशा त्रुटी आढळून आल्या आहेत.
यावरून या रुग्णालयालादेखील नोटीस बजावण्यात आली आहे.