लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराचा दैनंदिन सफाईचे काम पाहत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने बीएचआर प्रकरणातील संशयित सुनील झंवर यांना मक्तेदार नेमल्याचा चर्चा सुरु आहेत. याबाबत मनपा प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली असून, प्रत्यक्ष करारनाम्याची कागदपत्रे सादर करण्याबाबत मनपाने वॉटरग्रेस कंपनीला नोटीस बजावली आहे. करारनाम्यातील कागदपत्रांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आलेल्या सफाईच्या ठेक्याबाबत विविध आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तसेच बीएचआर प्रकरणी सुनील झंवर यांच्या कार्यालयात झालेल्या तपासणीत त्यांच्या कार्यालयात वॉटरग्रेस संबधीचे कागदपत्रे आढळल्याने या ठेक्यात झंवर यांचा हिस्सा असल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने या दृष्टीने तपासणीला सुरुवात केली आहे. जुलै मध्ये हा मक्ता परत सुरु झाल्यानंतर मक्तेदाराने कर्मचाºयांचे वेतन देण्यासाठी आधीची बॅँक बदलवून युनियन बॅँकेत आपले खाते उघडले आहे. त्यामुळे या दृष्टीने देखील मनपाकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मनपाचे विधी तज्ज्ञ अॅड.आनंद मुजूमदार यांच्याशी देखील चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, मनपाने वॉटरग्रेसला नोटीस बजावली असून, दोन दिवसात याबाबतचा खुलासा आल्यानंतर मनपाकडून पुढील तपासणी केली जाणार आहे.
अन्य ठेकेदार नेमता येणार नाही
निविदेच्या अटी शर्थीप्रमाणेम मनपाने ज्या मक्तेदाराला ठेका दिला आहे. त्याच मक्तेदाराने सफाईचे काम करायचे आहे. तसेच मक्तेदाराला तिराहीत ठेका देता येणार नाही असे निवदेत म्हटले आहे. त्यामुळे याबाबत देखील तपासणी मनपाने सुरु केली आहे. तिराहीत ठेकेदार नेमल्यास मक्तेदारावर मनपाकडून कारवाई करता येवू शकते. तसेच नियमबाह्य ठरवून मक्ता देखील रद्द करता येवू शकतो.