मोकाट कुत्र्यांचा निर्बिजीकरणासाठी संस्था निश्चित
जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून मोकाट कुत्र्यांची समस्या बिकट झाली असून, यावर तोडगा काढण्यासाठी मनपा प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा निर्बिजीकरणासाठी निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार नंदुरबार येथील नवसमाज बहुउद्देशीय संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली आहे. लवकरच या संस्थेला वाटाघाटीसाठी बोलावण्यात येणार असून, वाटाघाटी झाल्यानंतर संबधित संस्थेला कार्यादेश दिला जाणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.
नगरसेवक अपात्रप्रकरणी सोमवारी कामकाज
जळगाव - महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या भाजपच्या ३० बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे दाखल प्रस्तावावर शुक्रवारी कामकाज होणार होते. यासाठी भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी बोलाविण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी या प्रकरणी कोणतेही कामकाज होवू शकले नसून, आता २१ जूनची पुढील तारीख देण्यात आली असून, यादिवशी कामकाज होण्याची शक्यता आहे.
सलग चौथ्या दिवशीही पावसाची हजेरी
जळगाव -जिल्ह्यात आता मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून, गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे दोन दिवसांपासून वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे. तसेच पावसामुळे आता कापसाला देखील फायदा झाला असून, शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासही सुरुवात केली आहे. जळगाव तालुक्यात सोयाबीन, मूग, उडीदच्या पेरणीला वेग आला आहे. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात ९० टक्के पेरण्या पुर्ण होण्याची शक्यता आहे.
भंगार बाजार कारवाई रखडली
जळगाव - शहरातील अजिंठा चौकातील भंगार बाजारची मुदत संपून अनेक वर्ष झाली आहेत. तसेच ही जागा ताब्यात घेण्याबाबत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, चार महिने होवून देखील मनपाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. एकीकडे गाळेधारकांना नोटीसा दिल्या जात असताना, दुसरीकडे भंगार बाजाराला अभय देण्याचे काम मनपाकडून सुरु आहे.
ठेका नसतानाही उपसा सुरु
जळगाव - जिल्ह्यात १ जून पासून सर्व वाळू ठेक्यांची मुदत संपली आहे. मात्र, तरी देखील आव्हाणी, खेडी, आव्हाणे, निमखेडी, भोकणी व बांभोरी परिसरातील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. दिवसरात्र वाळू उपसा सुरु असल्याने महसूल विभागाचे लाखोंचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.