कोरोना नियंत्रणात आल्याने आता पीजे सुरू होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 2:15 PM
कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने एसटी, प्रवासी रिक्षा पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. गोरगरीब प्रवाशांची जीवन वाहिनी असलेली पीजे रेल्वेसेवा गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. पीजे रेल्वे सुरू करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहे.
जामनेर : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने एसटी, प्रवासी रिक्षा पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. गोरगरीब प्रवाशांची जीवन वाहिनी असलेली पीजे रेल्वेसेवा गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. पीजे रेल्वे सुरू करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. पाचोरा-जामनेर या मार्गावर धावणारी नॅरो गेज गाडी कोरोना संसर्गाच्या भीतीने पाचोरा यार्डातच थांबून आहे. कधी पाच तर कधी सहा डबे असलेल्या या गाडीच्या दिवसाला दोन फेऱ्या होतात. जामनेर, भागदरे, पहूर, शेंदुर्णी, पिंपळगाव, वरखेडी, पाचोरा या स्थानकावरून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या गाडीला सर्वसामान्यांची मोठी पसंती आहे. शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी गाडीच्या वेळा सोयीस्कर आहे. नववी, ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून नजीकच्या काळात पाचवी ते आठवीचे वर्ग देखील सुरू होऊ शकतात. लग्नसराईदेखील सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. या साऱ्या बाबींचा विचार करून पीजे रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जावा. खासदार रक्षा खडसे व खासदार उन्मेष पाटील यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करून गाडी सुरू करावी, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.