आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २४ - वाळू लिलावाच्या प्रक्रियेला दोन महिन्यांपूर्वी दिलेली स्थगिती नुकतीच उठविण्यात आली असून यामुळे आता वाळू गटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे आता नवीन वाळू धोरणानुसार वाळू उचलण्यास उपशाचे आदेश दिल्यानंतर वाळू ब्रासच्या प्रमाणातील ठरवून दिलेल्या कालावधीनुसार वाळू उपसा करता येणार आहे.जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०१७ अखेरपर्यंत २१ वाळू गटांची लिलाव प्रक्रिया झाली होती. त्यातून सुमारे चौदा कोटींचा महसूल जिल्हा प्रशासनास मिळाला. त्यानंतर नागपूर खंडपीठात वाळू लिलावांविरूध्द याचिका दाखल केल्याने खंडपीठाने राज्यातील सर्वच ठिकाणच्या वाळू गटांचे लिलाव करण्यास स्थगिती दिली होती. यामुळे जिल्ह्यातील २८ वाळू गटांचे लिलाव रखडले होते. आता नुकतीच ही स्थगिती खंडपीठाने उठविली आहे. यामुळे जिल्ह्यातील वाळू गटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता हे २८ वाळू गट बाद ठरून केवळ १५ वाळू गटांचे लिलाव आता होणार आहेत.नवीन वाळू धोरणानुसार वाळू उचलण्यास वाळू उपशाचे आदेश दिल्यानंतर वाळू ब्रासच्या प्रमाणातील ठरवून दिलेल्या कालावधीनुसार वाळू उपसा करता येणार आहे. पूर्वी वाळूचे लिलाव झाल्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा त्या गटातील वाळू संपेपर्यंत वाळूचा उपसा सुरू असे. आता असे होणार नाही. जर एखाद्या वाळू गटात तीन हजार ब्रास वाळू असेल तर वाळूच्या उपशाच्या आदेश दिल्यानंतर तीन महिनेच तेथील वाळूचा उपसा करता येईल. नंतर झालेल्या उपशाविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे.वाळू गटाची अपसेट प्राईजही नवीन वाळू धोरणानुसार ठरविण्यास सांगितले आहे. त्यानुसार येथील जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी, कर्मचारी नवीन धोरणानुसार वाळू गटांची अपसेट प्राइस ठरविण्याच्या कामास लागले आहे. नंतर वाळू लिलावाची आॅनलाइन प्रक्रिया सुरू होईल.
आता वाळू ब्रासच्या प्रमाणानुसार उपशाचा कालावधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:16 PM
लिलावावरील स्थगिती उठविली
ठळक मुद्देवाळू लिलावाचा मार्ग मोकळा ठरवून दिलेल्या कालावधीनुसार वाळू उपसा करता येणार