डायल ११२, आपत्कालिन परिस्थितीत पोलीस साहाय्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोणत्याही परिस्थितीत तात्काळ मदत हवी असल्यास आता नागरिकांना ११२ नंबर डायल करावा लागणार आहे. त्यानंतर दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी पोहोचतील. या नव्या यंत्रणेमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीला पोलीस तात्काळ पोहोचू शकणार आहेत. जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातच याची नवी कंट्रोल रूम सुरू होणार आहे. त्याची तयारी देखील सुरू आहे. या यंत्रणेसाठी पोलीस दलाला पाच नवी वाहने मिळाली आहेत. याआधी १५ नवी चारचाकी वाहने जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस दलाला मिळाली आहेत.
डायल ११२ ही यंत्रणा आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सुरू केली जाणार आहे. त्यासाठी ४९४ रिस्पॉन्डर तयार करण्यात आले आहेत, तर आठ कॉल रिसिव्हर तयार करण्यात आले आहेत. त्यांना १२ बॅचमध्ये त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचे राज्यातील डेटा सेंटर नवी मुंबईला असणार आहे. तसेच जळगावला कंट्रोल रूम असेल. या कंट्रोल रूममध्ये आठजण असतील. ते येणारे कॉल स्वीकारतील. त्यानंतर फोन करणाऱ्याचे लोकेशन त्यांना त्याचवेळी मिळेल. तेथून जवळ असणाऱ्या रिस्पॉन्डरला ते संदेश पाठवतील. त्यांच्याकडे देखील टॅबलेट आणि एक फिचर फोन दिला जाणार आहे. संदेश मिळाल्यावर रिस्पॉन्डर तातडीने घटनास्थळी पोहोचेल. अशाप्रकारे ही यंत्रणा काम करणार आहे. यात ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड यांचा देखील नंतर समावेश केला जाणार आहे.
जिल्ह्यातील पोलीस ठाणी - ३५
पोलीस अधिकारी - १९७
पोलीस कर्मचारी - ३४२७
मदत हवी असल्यास डायल करा... ११२
आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ मदत हवी असेल तर ११२ हा क्रमांक डायल करायचा आहे. अडचणीत असलेल्या नागरिकांचा संदेश मिळाल्यावर पोलीस कर्मचारी त्यांच्यापर्यंत तातडीने पोहोचणार आहेत. नागरिकांनी केलेला हा कॉल स्वतंत्र कंट्रोल रूमला जाणार आहे. त्यानंतर गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना ही माहिती मिळेल आणि लगेचच पोलीस मदतीला पोहोचतील.
कॉल येताच कळणार लोकेशन
डायल ११२ च्या कंट्रोल रूममध्ये फोन आल्यावर तेथे आठ जण हे फोन स्वीकारण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यावर एक सुपरवायजर असेल. फोन घेताच फोन करणाऱ्याचे लोकेशन मिळेल. तेथे तीन स्क्रिन असतील. त्यातील एका स्क्रिनवर फोन करणाऱ्याची माहिती मिळेल, तर एका स्क्रिनवर लोकेशन मिळेल आणि तिसऱ्या स्क्रिनवर माहिती भरली जाईल. ती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळणार आहे.
सध्या या योजनेसाठी ५ चारचाकी वाहने
सध्या या योजनेसाठी ५ नवीन चारचाकी वाहने देण्यात आली आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून १५ नवी वाहने मिळाली आहेत. आणखीही टप्प्या-टप्प्याने चारचाकी आणि दुचाकी वाहने मिळणार आहेत.
४९४ पोलीस कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
या योजनेत ४९४ पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात ६ वेगवेगळ्या बॅचेसमध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
------------
११२ क्रमांक डायल केल्यास अडचणीत असलेल्या नागरिकांना पोलिसांची तात्काळ मदत पोहोचू शकणार आहे. या नव्या यंत्रणेची १ जूनपासून ट्रायल अपेक्षित आहे. दोन प्रमुख कंट्रोल रूम असणार असून त्या मुंबई आणि नागपूरला असतील. तेथून सर्व कॉल संबंधित जिल्ह्यातील कंट्रोल रूमला जातील. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात नवी कंट्रोल रूम सुरू होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. आठ व्यक्ती तेथे फोन स्वीकारण्यासाठी असतील. फोन कोठून आला, तसेच पुढे पोलिसांनी काय कामगिरी केली, याची सुध्दा नोंद असणार आहे. या योजनेसाठी सहा वाहने मिळाली आहेत.
- डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव