फोटो : ८.३७ वाजेचा मेल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळांचे ऑनलाइन वर्ग भरणार आहेत. त्यामुळे सर्वांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहचावे व मोबाईल नसल्यामुळे कुणीही ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन आणि ‘वोपा’ सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक अभ्यासक्रम देणाऱ्या ‘व्ही स्कूल’ या प्रणालीचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
व्ही-स्कूल प्रणालीच्या ऑनलाइन कार्यक्रमात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, सिनेअभिनेते ललित प्रभाकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका दीपा देशमुख, अभिनेते पुष्कराज चिरपुटकर, नाशिक शिक्षण विभाग उपसंचालक नितीन उपासनी उपस्थित होते.
मल्टीमीडिया पद्धतीने अभ्यासक्रम
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इंटरनेटपासून ते अगदी अभ्यासासाठी वेळेत फोन मिळेपर्यंत अनेक गोष्टी यामध्ये असतात. या साऱ्याचा विचार करून ‘वोपा’ने ‘व्ही – स्कूल’ या ॲपची निर्मिती केली आहे. यामध्ये मल्टीमीडिया पद्धतीने अभ्यासक्रम उपलब्ध केला गेला असून अभ्यासाचे ऑफलाईन डाऊनलोडिंग शक्य आहे. तसेच, यात एकाच मोबाईलवरून अनेक विद्यार्थी अभ्यास करू शकतील. यासाठी शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक आणि प्रशासन सहकार्य करणार आहेत.
उर्दू भाषेतील शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार
जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जळगाव जिल्हा या शैक्षणिक ॲपमध्ये संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. यानिमित्ताने उर्दू भाषेतील शैक्षणिक साहित्य ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल, असेही राऊत यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
यांची केली नियुक्ती
व्ही स्कूल ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीम ॲप अंतर्गत ऑनलाइन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, एजाज शेख, सहाय्यक समन्वयक म्हणून साकीब शेख यांची नेमणूक करण्यात आली आहे. यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. http://edu.vopa.in/learn/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे.