प्रभाव ''लोकमत'' चा : गेल्या महिन्यातील दोन फेऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये होती नाराजी
प्रभाव लोकमतचा लोगो व इमेज टाकावी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यात भुसावळ ते पुणे दरम्यान मेमू ट्रेनच्या दोनच फेऱ्या चालविल्यामुळे प्रवाशांमधून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या बाबत ''लोकमत'' ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची रेल्वे प्रशासनाने दखल घेत, येत्या ६ मे पासून दर गुरुवारी पुण्यासाठी मेमू ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यात अचानक प्रसिद्धी पत्रक काढून १५ व २९ एप्रिल रोजी भुसावळ ते पुणे दरम्यान मेमू ट्रेनच्या दोन फेऱ्या चालविल्या. मात्र, या दोन्ही फेऱ्यांना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. अचानक जाहीर केलेल्या या गाडीमुळे अनेक प्रवाशांपर्यंत या गाडीची कुठलीही माहिती पोहचली नाही.
तसेच या गाडीची अनियमित फेरी, अनियमित वेळ आणि पंधरा दिवसातून एकदाच धावल्यामुळे या मेमू ट्रेनच्या दुसऱ्या फेरीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. रेल्वे प्रशासनातर्फे ही गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी नसून, त्यांच्याच सोयीसाठी केली असल्याचा सुरही प्रवाशांमधून उमटला. प्रवाशांच्या या भावना ''लोकमत''ने मांडल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने ही गाडी आठवड्यातून दर गुरुवारी व त्यानंतर टप्प्या-टप्प्याने फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्फो :
''लोकमत''च्या वृत्तांतर दर गुरुवारी मेमू ट्रेन चालविण्याचा निर्णय
रेल्वे प्रशासनाने मेमू ट्रेनच्या गेल्या महिन्यात दोनच फेऱ्या चालविल्यामुळे प्रवाशांमधून रेल्वेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच या दोन फेऱ्यांमुळे रेल्वे प्रशासनाला कुठलेही उत्पन्न न मिळता तोटाच सहन करावा लागला असल्याचे वृत्त प्रकाशित करून, प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी या गाडीच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने ६ मे पासून दर गुरुवारी जळगावहुन पुण्यासाठी मेमू ट्रेनची सेवा राहणार असून,तर दुसऱ्या दिवशी दर शुक्रवारी पुण्याहून जळगावसाठी मेमू ट्रेनची सेवा राहणार आहे. पहिल्या टप्प्यात ३० जुलै २०२१ पर्यंत ही सेवा अशा प्रकारे सूर राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
इन्फो :
कोरोनामुळे जनरल तिकिटाला बंदीच
या गाडीलाही कोरोनामुळे जनरल तिकीट बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षण करूनच प्रवास करावा लागणार आहे. ६ मे रोजी धावणाऱ्या या गाडीचे रेल्वे प्रशासनातर्फे तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले आहे.