सचिन देवजळगाव : रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यात वाढणाऱ्या प्रचंड तापमानामुळे एस.टी बसेसे रस्त्यातच ‘पंक्चर’ होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. हे टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एस.टीच्या चाकामध्ये हवा भरण्याऐवजी, ‘नायट्रोजन गॅस’ भरायला सुुरुवात केली आहे. महामंडळाने जिल्ह्यामध्ये फक्त जळगाव आगारात प्रायोगिक तत्त्वावर नुकताच ‘नायट्रोजन गॅस प्लॅन्ट’ उभारला आहे.महामंडळातर्फे आरामदायी प्रवासासाठी सर्व मार्गांवर सुसज्ज बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, रस्त्यांची दुरवस्था आणि काही ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे बसच्या चाकांचे मोठ्या प्रमाणावर घर्षण होत असते. तसेच वाढत्या तापमानाचाही यावर परिणाम होऊन, दररोज कुठल्या ना कुठल्या मार्गावरची बस रस्त्यातच पंक्चर होण्याचे प्रकार घडत आहेत. काही वेळा तर चाकातील हवेच्या कमी-जास्त दाबामुळे टायर फुटून, अपघातदेखील होण्याच्या घटना घडत असतात. लांब-पल्ल्याच्या मार्गावरील बस मध्येच पंक्चर झाल्यावर प्रवाशाना त्रास सहन करावा लागतो. यासाठी राज्य महामंडळाने राज्यातील महत्वाच्या आगारांमध्ये ‘नायट्रोजन गॅसचा प्लॅन्ट’ उभारण्याचे सुरु केले आहे. जळगाव आगारात काही दिवसांपूर्वी हा प्लॅन्ट कार्यान्वीत झाला आहे.असा आहे नायट्रोजन गॅसचा फायदानायट्रोजन गॅस हा थंड असून, हवेपेक्षा हलका असल्याने बसचे चाक पंक्चर होण्याचे प्रमाण कमी असते. वारंवार चाकातील गॅसचे प्रमाण तपासावे लागत नाही, नायट्रोजन गॅस प्रसरण पावत नाही,विशेष म्हणजे या गॅसमुळे टायरची डिस्क गंजत नाही. हजारो किलोमीटर बस चालूनही टायर गरम होत नाही,तसेच साधी हवा ही दोन ते तीन दिवसच टायरमध्ये असते. मात्र, नायट्रोजन गॅस टायरमध्ये भरल्यानंतर दहा ते बारा दिवस असतो. यामुळे बसची धावण्याची क्षमतादेखील वाढते. तसेच टायरमध्ये साधी हवा भरण्यासाठी साधारणत : अर्ध्या तासांचा कालावधी लागायचा, नायट्रोजन गॅस मात्र अवध्या पंधरा मिनिटात भरला जातो. यामुळे यांत्रिक विभागात काम करणाऱ्यांचा वेळही वाचला आहे.लवकरच इतर १० डेपोंमध्येही नायट्रोजनची सुविधामहामंडळाने राज्यातील मोजक्याच डेपोंमध्ये प्रायोगिक तत्त्वावर नॉयट्रोजन गॅसचा प्लॅन्ट उभारला आहे. यानंतर टप्प्या -टप्प्याने पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, जामनेरयासह जिल्हाभरातील सर्व डेपोंमध्ये नायट्रोजन गॅस प्लॅन्ट उभारला जाणार असल्याचे आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
लालपरीच्या चाकात आता ‘नायट्रोजन गॅस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:50 AM