जळगाव : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी घेतली जाणारी एनएमएमएसची परीक्षा ही २१ मार्च ऐवजी आता ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण विभागाने पत्र जारी केले आहे.
एनएमएमएस परीक्षा ही यंदा जिल्ह्यातील ९ केंद्रांवर घेतली जाणार आहे. यात २०७९ विद्यार्थी ही परीक्षा देतील. एनएमएमएस परीक्षा १४ मार्चला घेण्यात येणार होती. मात्र, एमपीएससी राज्य सेवेची परीक्षा असल्याने एनएमएमएस परीक्षेची तारीख बदलून २१ मार्च करण्यात आली होती. मात्र, पुन्हा एमपीएससी परीक्षेची तारीख पुढे ढकलून ती २१ मार्च झाली आहे. परिणामी, २१ मार्चला होणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा आता ६ एप्रिलला घेतली जाणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षण विभागाला कळविण्यात आले आहे.
अशी आहेत केंद्रे
एनएमएमएस परीक्षा ए. टी. झांबरे विद्यालय (जळगाव), जी. एस. हायस्कूल (पाचोरा), ए. बी. हायस्कूल (चाळीसगाव), संत गाडगेबाबा विद्यालय (भुसावळ), सानेगुरुजी विद्यालय (अमळनेर), न्यू इंग्लिश स्कूल (जामनेर), कुडे हायस्कूल (धरणगाव), के. नारखेडे विद्यालय (भुसावळ), प्रताप विद्यालय (चोपडा) या शाळांमध्ये घेतली जाणार आहे.