जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालये व विद्यापीठात केवळ पंचवीस ते तीस टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू होते. मात्र, आता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात शंभर टक्के पूर्ण क्षमतेने उपस्थितीबाबत कळविले आहे. त्यानुसार विद्यापीठात शंभर टक्के उपस्थितीने कामकाजाला सोमवारपासून सुरुवात झाली.
कोरोनामुळे खान्देशातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यापीठात सुद्धा पंचवीस टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू होते. दरम्यान, आता जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात शंभर टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत कळविले. त्यानुसार विद्यापीठाने शंभर टक्के कर्मचाऱ्यांना कामकाजाला उपस्थित राहण्याचे कळविले आहे. दरम्यान, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांनी स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करावी, अशाही सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत.