जळगाव : बोगस विमा व बोगस कागदपत्रे सादर करुन वाहनांची होणारी नोंदणी लक्षात घेता आता आरटीओने या प्रकाराला आळा घालण्यासाठी आॅनलाईन प्रमाणी सुरु केली आहे. वाहन-४ या प्रणालीवर वाहनांची नोंद होणार असून त्यावर विमा आॅनलाईन दिसणार आहे. नाही दिसला त्या वाहनाची नोंदच होणार नाही. या प्रणालीमुळे बोगस काम करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहे.बोगस कागदपत्राद्वारे आधारकार्ड, फिटनेस व विमा काढल्याचे दाखवून वाहनांची नोंदणी झाल्याचे प्रकार गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात घडले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हेही दाखल झाले आहेत. नागपूर आरटीओ कार्यालयाचा अधिकारी कुलमते याच्यावरही जळगावात गुन्हे दाखल झाले आहेत. भविष्यात अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी जळगाव आरटीओ कार्यालयात विम्याची नोंद आॅनलाईन घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, विम्यापाठोपाठ पीयुसी यंत्रणा देखील १ एप्रिलपासून आॅनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृत पीयुसी केंद्रातूनच वाहनधारकांनी पीयुसी घ्यावी असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.गेल्या वर्षात वाहनांच्या विविध कामकाजासाठी केवळ कागदोपत्री विम्यावर विसंबून राहिल्याने बोगस विम्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे वाहनांचा विमा देणाऱ्यांना ते आता वाहन -४ या आॅनलाईन यंत्रणेवर नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. आॅनलाईन नसेल तर आरटीओ कार्यालयांनी वाहनांची नोंदणीच करु नये असे आदेश दिले आहेत.बोगस पीयुसीलाही लगामपीयुसी केंद्रावरील यंत्रणा देखील १ एप्रिलपासून आॅनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे पीयुसी केंद्रावर तपासणी केल्यानंतर त्याची आॅनलाईन माहिती आॅनलाईन प्रणालीद्वारे आरटीओकडे येईल. त्यामुळे बोगस पीयुसी वाटपावरही लगाम बसणार आहे. आरटीओने मान्यताप्राप्त पीयुसी केंद्राची यादी जाहीर केली आहे.
बोगस विम्याला रोखण्यासाठी आता आॅनलाईन प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:52 AM