जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना पाठिंबा दिल्याच्या मुद्यावरून खाविआच्या नगरसेवकपदाचा राजीनामा देणारे विद्यमान महापौर पती व भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आता वॉटरग्रेसप्रकरणी तत्व दाखवत राजीनामा देवून दाखवावा असे थेट आव्हान मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी कैलास सोनवणे यांंना दिले आहे. प्रसिध्दीपत्रकाद्वारे महाजन यांनी हे आव्हान दिले आहे.वॉटरग्रेसला पुन्हा संधी देण्याचा मुद्यावरून भाजपमध्येच अंतर्गत गटबाजी वाढली असताना, आता विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी भाजप नगरसेवक कैलास सोनवणेंना आव्हान दिल्याने या मुद्यावरून पुन्हा भाजप विरुध्द शिवसेना असा आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगण्याची शक्यता आहे.शहराच्या सफाईसाठी वॉटरग्रेस कंपनीला पुन्हा संधी देण्याबाबत भाजपने पाठींबा दिला आहे. तर भाजपचेच महापौर भारती सोनवणे व त्यांचे पती कैलास सोनवणे यांनी वॉटरग्रेसला आपला विरोध कायम राहणार असल्याची भूमिका घेतली आहे.याबाबतच सुनील महाजन यांनी गाळेप्रश्नी तत्वांचा मुद्दा पुढे करत खाविआचा राजीनामा देणारे कैलास सोनवणे वॉटरग्रेसच्या मुद्यावरूनही भाजपचा राजीनामा देतील का ? असा प्र श्न उपस्थित केला आहे.तत्व आता संपले का ?1 महाजन यांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, २०१७ मध्ये गाळेधारकांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याकडून खाविआचा पाठींबा मागितला होता. तेव्हा सुरेशदादा जैन यांनी गाळेधारकांना पाठींबा देत खाविआच्या सर्व नगरसेवकांना गाळेधारकांना पाठींबा देण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, कैलास सोनवणे यांनी आपण गाळेधारकांविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना पाठींबा देवू शकत नसल्याचे सांगितले होते.2 पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांचा राजीनामा पक्षाने मागितल्यानंतर सोनवणे यांनी आपला स्विकृत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी भूमिका बदलली नव्हती. त्यामुळे आता त्यांनी आधी वॉटरग्रेसचा विरोध केला होता. आता पक्षाने वॉटरग्रेसला पाठींबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोनवणे पक्षाच्या भूमिकेनुसार आपलीही भूमिका बदलवून तत्वांना तिलांजली देणार , का ? तत्वाशी कायम राहून राजीनामा देणार ? हे कैलास सोनवणे यांनी जाहीर करावे. पदामुळे तत्वांना आता महत्व देणे संपले का ? असाही प्रश्न सुनील महाजन यांनी उपस्थित केला आहे.गाळेप्रश्नी न्यायालयाने निर्णय दिल्याने त्याविरोधात मोर्चा काढणे योग्य नव्हते. ही भूमिका आपण तेव्हा घेतली होती. हीच भूमिका नंतर खाविआनेही मान्य करत गाळेधारकांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याचे रद्द केले होते. गाळेधारकांच्या विरोधात तेव्हाही भूमिका नव्हती व आताही नाही. वॉटरग्रेस व गाळेप्रश्न वेगळा आहे. वॉटरग्रेसबाबत आपण पक्षाच्या भूमिकेसोबत आहे. तसेच मी स्विकृत नगरसेवक असल्याने माझ्या मताला महासभेत फारसे महत्वही नाही. अशा परिस्थितीत राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. -कैलास सोनवणे, नगरसेवक भाजप
गाळेप्रश्नी दिला तसा आता राजीनामा देवून दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:34 PM