मिलिंद कुलकर्णीजळगाव : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती तर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसची आघाडी राहण्याची दाट शक्यता आहे. राष्टÑवादीने पूर्वी इतक्या जागा राखल्या तर काँग्रेसचे एका जागेने नुकसान झाले. भाजप- सेनेने गतवेळेची कामगिरी कायम ठेवली. काही ठिकाणी युती आणि आघाडीत बेबनाव दिसून आला. त्यावर मार्ग काढला जाईल. वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरे यांच्या सभा यांचा परिणाम याविषयी विधानसभेच्यादृष्टीने फेरमांडणी होऊ शकते.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निकालाकडे पाहिले तर भाजप-शिवसेनेला जे मोठे यश मिळाले आहे ते पाहता या पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी होईल, असा अंदाज वर्तविता येतो. तुलनेने दोन्ही काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे उमेदवारांचा ओघ कमी राहील. काँग्रेस आघाडीला तर उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल, अशी स्थिती राहील. २०१४ मध्ये साऱ्याच पक्षांनी स्बळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी प्रत्येक पक्षाला आपल्या ताकदीचा अंदाज आला होता.खान्देशातील २० जागांचा विचार केला तर गेल्यावेळी सर्वाधिक १० जागा भाजपने जिंकल्या होत्या. सहा महिन्यांपूर्वी असलेल्या मोदी लाटेचा परिणाम या निवडणुकीत पुन्हा दिसून आला होता. यंदाही तो दिसावा, अशी अपेक्षा भाजपला असणार आहे. यंदा त्यांच्यासोबत शिवसेना राहील, त्यामुळे मतांचे विभाजन टळेल.शिवसेनेला जळगाव जिल्ह्यात ३ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या ५ जागा या नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून निवडून आल्या होत्या. राष्टÑवादीची एक जागा एरंडोलची तर अपक्ष अमळनेरातून निवडून आले होते.भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची खरी कसोटी ही जागा वाटप आणि उमेदवार निश्चितीच्यावेळी लागणार आहे. परंतु, दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेतृत्व आणि स्थानिक नेते आता परिपक्वतेने हा प्रश्न हाताळतील, अशी उदाहरणे लोकसभा निवडणुकीत दिसून आली. पालघरची पोटनिवडणूक प्रचंड गाजल्यानंतर भाजपच्या राजेंद्र गावीत यांना सेनेने शिवधनुष्य देऊन रिंगणात उतरविले, हे वेगळे उदाहरण होते.लोकसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्टÑात शिवसेनेच्या दोन जागांसह सर्व ८ जागा जिंकण्याचे भाकीत प्रत्यक्षात उतरविल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांचे वजन निश्चित वाढलेले आहे. त्यामुळे जागा आणि उमेदवाराचा पेच प्रसंग निर्माण झाल्यास महाजन तो कुशलतेने हाताळतील, असे वाटते.लोकसभा निवडणुकीतील यशामुळे भाजप-सेनेचे कार्यकर्ते गाफील राहिले तर मात्र अघटित घडू शकते. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि कर्नाटकात काँग्रेसला अवघ्या चार महिन्यांपूर्वी यश देणाºया जनतेने लोकसभेत मात्र भाजपला हात दिला. मतदारांची मानसिकता पाहता भाजप-सेनेला दक्ष रहावे लागेल. दोन्ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते पराभवाच्या धक्क्यातून सावरत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागतील. नवे मित्र जोडतील. मात्र जागा वाटप व उमेदवार निश्चिती वेळेत झाल्यास प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळू शकणार आहे. सगळ्यांना ते फायदेशीर ठरु शकते.व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो हा विचार लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झाला. जळगावचे विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापले; विद्यमान विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना आधी तिकीट दिले आणि नंतर तेही कापले, ऐनवेळी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट मिळाले आणि त्यांनी विक्रमी मते मिळवित विजय प्राप्त केला. अनिल गोटे आणि डॉ.सुहास नटावदकर यांनी भाजपविरोधात बंडखोरी केली. पण त्यांना अनामत वाचविता आली नाही. भाकरी फिरवावी लागते, हे तत्व भाजपने खूप चांगल्या पध्दतीने अंगिकारले आहे.
आता लागले ‘मुंबई’चे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 5:07 PM