लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या महिनाभरापासून शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असून, दुसरीकडे कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मरणानंतरही स्मशानभूमीत यातना सहन कराव्या लागत असून, अंत्यसंस्कारासाठी तासन्तास वाट पाहावी लागत आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असल्या तरी गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा आलेख चढताच आहे. चालू एप्रिल महिन्यातही तशीच परिस्थिती असून १ एप्रिल रोजी १ हजार १६७ रुग्ण आढळून आले असून, त्यात एकट्या जळगाव शहरातील १०१ रुग्णांचा समावेश आहे. तसेच २ एप्रिल रोजी १ हजार २४२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यात जळगाव शहरात २४९ रुग्ण आढळून आले होते. ३ रोजी १ हजार ९४ रुग्ण आढळून आले असून, त्या मध्ये जळगावातील २३० रुग्णांचा समावेश आहे. तर ४ रोजी १ हजार १७९ रुग्ण आढळून आले असून, त्यात शहरातील बधितांची संख्या २४८ आढळून आली आहे. अशा प्रकारे शहरातील बाधितांच्या आकडेवारीचा आलेख चढताच असून, मृत्युदरही चढताच आहे. १ ते ४ एप्रिल या चार दिवसांत जळगाव शहरात तब्बल १७ कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे.
इन्फो :
जन्म-मृत्यू विभागात रांगा
-मनपातर्फे नेरी नाका स्मशानभूमी कोरोना बाधित मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे आहे. तर शिवाजी नगर, पिंप्राळा व मेहरूण येथील स्मशान भूमीत नैसर्गिक मृत्युमुखी पावलेल्यांचे अंत्यसंस्कार होत आहेत.
- अंत्यसंस्कारासाठी स्मशान भूमीचा परवाना मिळविण्यासाठी मनपातर्फे शहरातील प्रत्येक स्मशानभूमीतच परवाना मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे. सध्या नेरी नाका स्मशानभूमीत बाधितांवर अंत्यसंस्काराची परवानगी मिळण्यासाठी नातलगांची सकाळपासूनचं गर्दी होत आहे.
- मनपातर्फे नेरी नाका स्मशानभूमीत कोरोना बाधितांवर २४ तास अंत्यसंस्काराची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे हा परवाना मिळण्यासाठी गर्दीचे प्रमाण कमी झाले असल्याचेही सांगण्यात आले.
इन्फो :
दररोज ८ ते १० जणांवर अंत्यसंस्कार
- शहरात एकीकडे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत
असतांना दुसरीकडे कोरोना बाधित मृत्युमुखी पडणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. दररोज नेरी नाका स्मशानभूमीत ८ ते १० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
- शहरातील रुग्णालयांमध्ये बाहेरील कोरोनाबाधित नागरिकही उपचारासाठी येत असून, उपचार सुरू असताना जर एखाद्या बाधिताचा मृत्यू झाला, तर त्या बधितावर जळगावातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. त्यामुळे नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात आले.