लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पंधरा दिवसांपूर्वी सदस्याचे नाव कळविल्यानंतही अद्याप ''कुलगुरू शोध समिती' गठीत झालेली नाही. त्यामुळे राजभवनात समिती स्थापन करण्यासाठी कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून येते. दरम्यान, ही समिती कधी गठीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कार्यकाळ संपण्यापूर्वी प्रा. पी. पी. पाटील यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सद्य:स्थितीला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन यांच्याकडे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची जबाबदारी आहे. दोन आठवड्यांपूर्वी कुलगुरू पदाच्या निवड प्रक्रियेसाठीच्या हालचालींना सुरुवात झाली होती. ८ एप्रिल रोजी व्यवस्थापन व विद्या परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत 'कुलगुरू शोध समिती' साठी सदस्य म्हणून खडगपूर आयआयटीचे प्रा. डॉ. वीरेंद्र तिवारी यांच्या नावाची निवड केली होती. नंतर हे नाव कुलपती कार्यालयास कळविण्यात आले होते. दरम्यान, या प्रक्रियेला आता दहा ते पंधरा दिवस झाले आहे. मात्र, राजभवनातून समितीच्या अध्यक्षासाठी अद्याप कुठलीही हालचाल सुरू नाही. सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ सुद्धा बंद आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर देखील जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
समितीचे अध्यक्ष असतील निवृत्त न्यायाधीश
'कुलगुरू शोध समिती'च्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश असतील. त्यांची निवड कुलपती करतील. दरम्यान, ही निवड होऊन समिती कधी गठीत होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या विद्यापीठात प्रमुख पदांवर प्रभारी राज सुरू आहे.
अशी होईल निवड
कुलगुरू शोध समिती गठीत झाल्यानंतर आधी तिच्या कामास सुरुवात होईल. नंतर विद्यापीठ प्रतिनिधीची निवड होईल. हा प्रतिनिधी समितीला विद्यापीठातील संपूर्ण माहिती देण्याचे काम करेल. तसेच समितीत कुलगुरू निवडीसाठीचे निकष, पात्रता आणि इतर बाबी निर्धारित होतील. तसेच विद्यापीठाला कुलगुरू पदासाठी जाहिरात प्रकाशित करावी लागणार आहे. समितीकडे आलेल्या अर्जांच्या छाननीनंतर प्रत्यक्ष मुलाखती घेऊन अंतिम पाच संभावित कुलगुरूंची नावे कुलपती कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर कुलपती स्वत: त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन कुलगुरू निवडीची घोषणा करतील.