ऑनलाईन लोकमत
यावल, दि.9 - जिल्ह्यात उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या यावल एसटी आगाराच्या सर्व बसेसमध्ये आता अत्याधुनिक व जगाशी जोडणारी वाय-फाय सेवा सुरू केली जाणार आहे. काही बसेसमध्ये ती सुरू देखील झाल्याचे आगार प्रमुख डी.जी. वंजारा यांनी शनिवारी सांगितले. आगामी नवरात्रोत्सवानिमित्त यावल तालुक्यातील श्री मनुदेवी यात्रेसाठी स्थानिक आगाराच्या 15 बसेससह जिल्ह्यातील अन्य आगाराच्या 20 अशा एकूण 35 बसेस जादाच्या सोडल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावल एसटी आगाराकडे एकूण 77 बसेस आहेत.त्यामाध्यमातून दिवसभरात 215 बसफे:या होतात. या बसेस दिवसाकाठी 25 हजार कि.मी. धावत असतात. अशा सर्व बसेसमध्ये ‘वाय-फाय’ ही आधुनिक प्रणाली सुरू करण्याच्या कामास सुरवात झाली असल्याचे सांगत काही बसेसमधून अशी सेवा या आधीच सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. बसेसमध्ये वाय-फाय सेवेसाठी यंत्र जोडण्याच्या कामास सुरवात झाली आहे. लवकरच सर्व बसेसमध्ये ती सुरू होणार आहे. यासेवेमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचा इंटरनेटद्वारे जगाशी संपर्क वाढणार आहे असेही त्यांनी सांगितले.