जळगाव : शहरातील खड्डयांच्या श्नाबाबत सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, बुधवारी सामाजिक संघटनांनी मनपा आयुक्तांकडे खड्डे दुरुस्तीची मागणी केल्यानंतर गुरुवारी तरुणाई आक्रमक झाल्याचे दिसून आले. युवाब्रिगेडियर्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी मनपासमोर साखळी उपोषण पुकारले असून, जोपर्यंत खड्ड्यांची दुरुस्ती होणार नाही तोवर उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा या युवकांनी घेतला आहे.मनपासमोरच युवा फाऊंडेशनच्या सदस्यांनी उपोेषण पुकारले असून, गुरुवारी शहरातील अनेक युवकांनी उपोषणस्थळी जावून भेट घेत या उपोषणाला पाठींबा दिला आहे. तसेच अनेक नागरिकांनी देखील या ठिकाणी हजेरी लावत खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. युवा ब्रिगेडियर्स संघटनेकडून मनपा आयुक्तांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले होते की, खराब रस्त्यांमुळे गेल्या आठवड्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून, भविष्यात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास अजून काही निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याची भिती आहे. त्यामुळे तत्काळ शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच ही दुरुस्ती जोपर्यंत होणार नाही, तो पर्यंत उपोषण कायम ठेवणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सागर बोरोले, चेतन कोल्हे, स्वप्नील कोल्हे, अमेय राणे, चेतन पाटील, हिंमाशु सोनार, प्रितेश मोरे, विपुल मोरे, दीपक कोल्हे, हर्षल पाटील आदी उपस्थित होते.
खड्ड्यांच्या प्रश्नासाठी आता तरुणाईही पुढे सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:05 PM