एरंडोल : नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीने दुचाकीस धडक दिल्याने पद्मालय-मुगपाठ येथे घराकडे जाणारा दलपत श्रावण सोनवणे (वय २९) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेवाजेच्या सुमारास पद्मालय रस्त्यावर महादेव मंदिरानजीक झाला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एरंडोल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल नगरपालिकेची घंटागाडी (क्र. एम. एच. १९, सी. वाय. ०१३५) पद्मालय रस्त्यालगत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन डेपोवर कचरा टाकून एरंडोल गावाकडे परत येत होती. त्या वेळी दुचाकीने (क्र. एम. एच. १९, ए.डी. ७३१५) दलपत सोनवणे हा तरूण एरंडोलकडून पद्मालय-मुगपाठ येथे जात असताना त्याच्या दुचाकीस या घंटागाडीने धडक दिली. त्यात दलपत हा जागीच ठार झाला.दलपत सोनवणे हा कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्याच्या निधनामुळे कुटुंबाचा पोषणकर्ता हरविला आहे. सदर तरुण कंपनीतून घरी परतत असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या तरुणाच्या निधनामुळे सोनवणे कुटुंबावर आभाळ कोसळळे आहे. ग्रामीण रुग्णालयात डॉ. रेणुका भंगाळे यांनी दलपतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भिमराव मोरे, राजू पाटील, अमित तडवी, श्रीराम पाटील, उमेश पाटील हे तपास करीत आहे.
एरंडोल येथे न.पा. घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 5:53 PM