लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोठ्या प्रमाणात वाढलेला संसर्ग आणि बेड उपलब्ध होत नसल्याची निर्माण झालेली गंभीर स्थिती यातून गुरूवारी शहराला थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. नव्या २६४ रुग्णांची नोंद झाली मात्र, दुसरीकडे ४२८ रुग्णांना घरीही सोडण्यात आले. याने ॲक्टीव्ह केसेसची संख्या घटून २८५० वर आली आहे. दरम्यान, मृत्यू रोखणे मात्र, प्रशासनासमोरील आव्हान कायम आहे. तीन बाधितांच्या मृत्यूची नाेंद झाली असून यात एका ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आता रुग्ण समोर येत आहेत. आधी शांत असलेल्या अनेक तालुक्यांध्ये मोठी रुग्णवाढ होताना दिसत आहे. यात जळगाव शहरासह चोपडा, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, अमळनेर या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने अधिक रुग्ण समोर येत आहे. जिल्ह्यातील ९९५ रुग्ण बरे झाले असून यात जळगाव शहरातील ४२८ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये जळगाव ३, रावेर ३, यावल २ तर भुसावळ, बोदवड, धरणगाव, चोपडा या तालुक्यातील प्रत्येकी १ बाधिताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पॉझिटिव्हिटी
आरटीपीसीआर : ५१ . ५० टक्के
ॲन्टीजन : १५. ५६ टक्के
लक्षणे नसलेले रुग्ण ७९९३
लक्षणे असलेले रुग्ण २४६१
ऑक्सिजनचा पुरवठा करावे लागणारे रुग्ण : ८३२
अतिदक्षता विभागात दाखल रुग्ण ३६९
जीएमसी ॲक्शनमोडवर
बेड वाढविण्यासह सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे कार्यरत झाले आहेत. कोविड उपचारानंतर परतल्यानंतर त्यांनी तातडीेने सूत्र हातात घेऊन बेड मॅनेजमेंटचा माेठा मुद्दा काही अंशी निकाली काढला आहे. दरम्यान, त्यांनी तातडीने औषध वैद्यक शास्त्र विभागाची गुरूवारी सायंकाळी बैठक घेतली. यात प्रमुख डॉक्टर्सना त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे. विविध समित्यांच्या कामकाजांचा त्यांच्याकडून नियमीत आढावा घेतला जात आहे.
पाच पोलीस नियुक्त
रुणाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून होणारे आरोप व तणावग्रस्त परिस्थती टाळण्यासाठी जीएमसीत पाच पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षकांनी या पाच पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात सीटू कक्षाबाहेर दोन पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.