जळगाव : कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सातत्याने वाढत होती. मात्र आता बुधवारी प्रथमच सक्रिय रुग्णांची संख्या २३२ ने कमी झाली आहे. बुधवारी ११५८९ एवढे सक्रिय रुग्ण होते. तर नवे बाधित ९८४ आणि बरे झालेल्यांची संख्या ११९५ एवढी आहे.
गेल्या काही दिवसांपासून चोपड्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आढळून येत होते. आता हेच प्रमाण कमी झाले आहे. बुधवारी चोपड्यात कोरोनाचे फक्त १२ नवे बाधित आढळून आले आहेत; मात्र मुक्ताईनगरला तब्बल १५८ नवे रुग्ण आहेत. त्यासोबतच तालुक्यात ७०३ सक्रिय रुग्ण झाले आहेत. यावल तालुक्यात ६७ एरंडोलला ७३ नवे बाधित आहेत. जळगाव शहरातदेखील २११ नवे बाधित आहेत. बोदवडला एकही नवा बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.
गंभीर रुग्णांची संख्या जास्त
सक्रिय रुग्ण कमी झालेले असले तरी सध्या कोविड रुग्णांपैकी ७५० रुग्ण हे आयसीयूमध्ये आहेत आणि ऑक्सिजन वायु सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही १५५४ एवढी आहे. तर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ३३७३ एवढी झाली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्ण जरी कमी झाले तरी गंभीर असलेल्या रुग्णांची संख्या मात्र वाढलेली आहे.
चाचण्यांची संख्यादेखील कमी
गेल्या काही दिवसांपासून दररोज दहा हजाराच्या आसपास चाचण्या केल्या जात होत्या; मात्र बुधवारी २४५४ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तर ५५३२ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील प्रलंबित अहवालांची संख्याही २६१४ एवढी आहे.
सक्रिय रुग्ण संख्या
१४ एप्रिल ११५८९
१३ एप्रिल ११८२१
१२ एप्रिल ११७४०
११ एप्रिल ११७५०
१० एप्रिल ११७१६
९ एप्रिल ११७०९
८ एप्रिल ११७३५
७ एप्रिल ११७०२