लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी सहा नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर १० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता १०० झाली आहे. तसेच शुक्रवारी कोरोनाने एकही बळी गेला नाही.
शुक्रवारी दिवसभरात २,०२१ आरटीपीसीआर आणि १,९४२ रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातून हे सहा पॉझिटिव्ह समोर आले आहेत. तसेच बरे होणाऱ्यांची संख्या शुक्रवारीदेखील जास्त असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट आली आहे. गुरुवारी १०४ असलेली ही रुग्णसंख्या आता १०० झाली आहे. या १०० पैकी ७२ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर लक्षणे असलेल्यांपैकी १८ जणांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात येत आहे. तर आयसीयूत ८ जणांवर उपचार सुरू आहेत.
बोदवड आणि एरंडोल तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नाही. तर भडगाव आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी फक्त एकच रुग्ण आहे. तसेच जळगाव शहरात २१, भुसावळ १२ आणि चाळीसगाव ३६ वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या एकेरी आकड्यात आहे.