जळगाव : शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून नियमित बाधित येणाऱ्यांची संख्याही साडेतीनशेच्या घरात पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता कोरोना चाचणी करणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या महिनाभरात प्रचंड वाढले आहे. शासकीय तंत्रनिकेतन या केंद्रावर सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आता तंत्रनिकेतन या ठिकाणी दोन केंद्रांवर तपासणी केली जात आहे. रविवारी हे नवीन केंद्र सुरू करण्यात आले.
सरासरी ५५० चाचण्या रोज या ठिकाणी होत आहेत. सुरुवातीला काही दिवस सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नव्हते. मात्र, मध्यंतरी यंत्रणेने याचे नियोजन करून आता या केंद्रावर नागरिक शिस्तीचे पालन करीत असल्याचे चित्र आहे. शहरात गेल्या काही दिवसांत बाधितांचे प्रमाण हे झपाट्याने वाढले आहे. गेल्या तीन महिन्यांत नियमित सरासरी शंभरपर्यंत चाचण्या होत होत्या. हेच प्रमाण थेट ५५० पर्यंत गेले आहे. कधीकधी सायंकाळपर्यंत केंद्रांवर गर्दी राहत असल्याचे चित्र आहे.
ॲण्टीजेन, आरटीपीसीआर या केंद्रांवर ॲण्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहे. मध्यंतरी, आरटीपीसीआरचे प्रमाण वाढविण्यात आले होते. त्यानंतर, ॲण्टीजेनचे प्रमाण वाढविण्यात आले असून यात अनेक जण बाधित आढळून येत आहेत. ॲण्टीजेनमध्ये बाधित येण्याचे प्रमाण या केंद्रावर ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण : ६८६६२
बरे झालेले रुग्ण : ६०५१७
एकूण कोरोना बळी : १४३२
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण : ६७१३
दररोज तपासणी होणारे : ५५०
दोन दिवसांपासून त्रास जाणवत होता. त्यामुळे टेस्ट करण्यासाठी आलोय, गर्दी आहे. या ठिकाणी रजिस्टरमध्ये नोंदणी करून त्यानंतर पुन्हा नोंदणी करून एक क्रमांक दिला जातो. त्यानंतर टेस्ट केली जाते. अहवाल लवकर मिळतो. टेस्टिंगसाठी आलेली व्यक्ती केंद्रावर गर्दी वाढली आहे, मात्र, नागरिक दूर दूर उभे असतात. ॲण्टीजेन टेस्ट झाल्यानंतर रिपोर्ट लवकर समजत असल्याने आपण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे लवकर कळते.
- टेस्टिंगसाठी आलेली व्यक्ती
कोट
केंद्रावर आल्यानंतर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क वापरावे. गर्दी होऊ नये म्हणून तपासणीसाठी आणखी एक केंद्र शेजारीच सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी संयम ठेवून प्रशासनास सहकार्य करावे.
- डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा