लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्ण संख्येत गेल्या तीन दिवसांपासून झपाट्याने घट झाली असून, गुरुवारी जिल्ह्यात ३५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन दिवसांत दुपटीने रुग्ण संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील मृत्यूमध्येही घट झाली असून, गुरुवारी जिल्हाभरात दहा मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. दुसरीकडे चाचण्यांचे प्रमाण स्थिर असताना पॉझिटिव्हिटी कमी झाल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.
विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये दहापेक्षा कमी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. याचे एक कारण ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा डॉक्टरांकडून केला जात आहे. त्यामुळे कोरोनाचा आलेख घसरत असल्याचे हे सकारात्मक संकेत असल्याचे यंत्रणांचे म्हणणे आहे.