लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काँग्रेसच्या गत कार्यकारिणीत जिल्ह्याला चार पदे मिळाली होती, यंदा मात्र ही संख्या एकवर आली आहे. गेल्या कार्यकारिणीतील केवळ आमदार शिरीष चौधरी यांची प्रदेश सरचिटणीसपदावरून प्रदेश उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे. मात्र, विस्तारित कार्यकारिणीत आणखी पदे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रदेश कार्यकारिणी जाहीर करताना प्रत्येक जिल्ह्यातील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यास या कार्यकारिणीत घेतले जाते. मात्र, जळगावाला त्यामानाने झुकते माप मिळाले होते. जिल्ह्याला प्रदेशवार चार पदे मिळाली होती. यंदा मात्र, कार्यकारिणीत बदल होऊन पहिल्या कार्यकारिणीत जिल्ह्याला एकच पद मिळाले आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणावर याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी सर्व एकत्रित मिळूनच काम करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येते.
प्रदेशस्तरावर पदे मात्र महानगराध्यक्षपद रिक्त
काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची प्रदेशवार निवड होत असली तरी त्याचा स्थानिक काँग्रेस वाढीसाठी फायदा होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एकच जागा लढवायला मिळाली होती. ती काँग्रेसने जिंकली. मात्र, आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्रित परिस्थिती बघता यश मिळविणे हे काँग्रेसला सोपे नसेल, असे एकत्रित चित्र आहे. त्यातच गेल्या दीड वर्षापासून काँग्रेसचे जळगाव महानगराध्यक्षपद रिक्तच असून, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्याकडे हा पदभार आहे. यामुळे शहरात काँग्रेस पक्षाची संघटना आहे कुठे? असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो.
...अशी होती गत कार्यकारिणी
तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यकारिणीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष, डी.जी. पाटील यांच्याकडे प्रदेश सचिव, आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस व ललिता पाटील यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस, अशी जबाबदारी सोपविण्यात आली होती. यात ललिता पाटील भाजपमध्ये गेल्याने हे पद रिक्त होते. त्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हीच कार्यकारिणी कायम केली होती.
कोट
विस्तारित कार्यकारिणीत काय होणार, हे आताच सांगता येणार नाही. जिल्ह्याला पदे मिळूही शकतात. संघटनेत बदल होत असतात. मात्र, जिल्ह्यात सर्व एकत्रित मिळूनच काम करणार आहेत.
-ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस