लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदा सर्वदुर असलेली पाण्याची मुबलकता, तलाव व धरणांमध्ये खोलगट करण्यात आलेला भाग यामुळे यंदा मेहरुण तलाव परिसरात विदेशी पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे. निसर्ग मित्र संस्थेतर्फे रविवारी मेहरूण तलाव परिसरात पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जानेवारी महिन्यात नेहमी देशी-विदेशी पक्ष्यांच्या चिवचिवाटामुळे गजबजणारा तलाव यंदा शांत असल्याचे आढळून आले. काही स्थानिक व विदेशी पक्ष्यांनी तलाव परिसरात हजेरी लावली असली तरी अनेक पक्ष्यांनी यंदा मेहरूण तलाव परिसराकडे पाठ फिरविल्याचेच दिसून येत आहे.
निसर्गमित्र संस्थेतर्फे रविवारी मेहरुण तलाव परिसरात पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संस्थेचे प्रमुख राजेंद्र गाडगीळ, शिल्पा गाडगीळ यांच्यासह उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, डॉ.अक्षता महा, कनिष्का कुलकर्णी, लावण्या कुलकर्णी यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणात सहभाग घेतला. पक्षीनिरीक्षणादरम्यान एकूण ४७ प्रकारच्या प्रजाती आढळून आल्या. यामध्ये वॉटर बर्ड, पांढरा पक्षी , चार प्रजातीचे बदक, तुतारी, चिखल्या, शेकाटे, बगडे, पानकावळे, पान कोंबड्या, हीरॉन,पॉन हीरॉन सैबेरीया श्वेत कंठी युरोप, आशियाई तपकीरी माशीमार, पिवळा धोबी उत्तरेकडून वारकरी बदक, हळदी-कुंकु बदक या पक्ष्यांचा समावेश आहे.
पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे कारण
यंदा सर्वदुर पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याचा शोधात महाराष्ट्रापर्यंत येणारे पक्षी मध्यप्रदेश, राजस्थान या भागातच थांबले आहेत. यासह मेहरूण तलाव परिसरात गाळ काढताना, काही टेकळ्या देखील काढण्यात आल्या. यामुळे पक्ष्यांना लागणारी पाणथळ जागा मेहरूण तलावात कमी झाली आहे. खोल पाण्यात पक्ष्यांना अन्न मिळत नाही. तसेच पक्षी या पाण्यात उभे सुध्दा राहू शकत नाहीत. मनपाकडून गाळ काढताना चुकीची पध्दत वापरल्याने पक्ष्यांनी मेहरूण तलावाकडे पाठ फिरवल्याचे पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले.
फेब्रुवारीत पक्ष्यांची वाढू शकते संख्या
मेहरूण तलाव परिसरात साधारणपणे डिसेंबर महिन्यापासून विदेशी पक्ष्यांचे आगमण होत असते. मार्च महिन्याचा शेवटच्या आठवड्यानंतर या पक्ष्यांचा परतीचा प्रवास सुरु होत असतो. दरम्यान, जानेवारी महिन्यात जरी पक्ष्यांनी पाठ फिरवली असली तरी मात्र फेब्रुवारी महिन्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण, तलाव परिसरातील पाणी कमी होईल त्यामुळे पाणथळ जागा तयार होईल, यामुळे पक्ष्यांना मुबलक अन्न उपलब्ध होईल.