भंगार पडूनच
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी कक्षातून बाहेर काढण्यात आलेले भंगार अद्यापही प्रयोगशाळेसमोर पडून आहे. पावसाळ्यापूर्वी याचा लिलाव झाला नाही, तर या ठिकाणी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, शिवाय यात पाणी साचून त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
दोन गेटवर तपासणी
जळगाव : जिल्हा परिषदेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जुन्या व नवीन अशा दोन इमारतींमध्ये गेटवरच ऑक्सिमीटर व थर्मल गनद्वारे तपासणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्य गेट हे बंदच करण्यात आले असून, जुन्या इमारतीचे एक द्वार बंद करण्यात आले आहे.
वाहतुकीची कोंडी
जळगाव : अजिंठा चौफुलीवर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. चारही बाजूने येणारी वाहने एकत्रित आल्याने ही कोंडी झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी ती काही वेळाने सुरळीत केली. वाहतूककोंडी या मोठ्या चौकांमध्ये वारंवार होत असल्याने, या ठिकाणी सिग्नल यंत्रणा असावी, असाही सूर उमटत आहे.