लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात अतिदक्षता विभागातील रुग्णसंख्येत दोनच दिवसात ५१ ने वाढ नोंदविण्यात आली असून, ही संख्या ८०१ वर पोहोचली आहे. शासकीय यंत्रणेतील सर्व आयसीयू फुल्ल झाले असून, व्हेंटिलेटरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गुरुवारी जळगाव शहरात २१२ नवे रुग्ण आढळून आले असून, ४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण मृत्यूपैकी तीन ४० वर्षाखालील तर सात मृत्यू हे ५० वर्षाखालील रुग्णांचे आहेत. कोरोनाचा धोका सर्वच वयोगटातील रुग्णांना सारखा असल्याचे दुसऱ्या लाटेत वारंवार समोर आले आहे. त्यामुळे लवकर तपासणी करून घ्या, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असते. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या काहीशी नियंत्रणात असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपासून ही संख्या कमी झाली आहे; मात्र शहरातील मृत्यू थांबत नसल्याचे चित्र आहे.
गंभीर रुग्ण २३०० वर, ऑक्सिजनची गरज असलेले रुग्ण १५३७ तर अतिदक्षता विभागात ८०१ रुग्ण दाखल आहेत. ही संख्या २३३८ वर पोहोचली आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत असल्याचे गंभीर चित्र आहे.
ॲन्टिजन वाढल्या आरटीपीसीआर घटल्या
जिल्ह्यात एकूण ॲन्टिजन चाचण्या वाढल्या असून, शुक्रवारी ७६७७ ॲन्टिजन चाचण्या करण्यात आल्या तर आरटीपीसीआर चाचण्या मात्र ९३२ करण्यात आल्या तर १३८५ आरटीपीसीआर तपासणीचे अहवाल समोर आले. यात बाधितांचे प्रमाण मात्र नेहमीसारखेच असल्याचे चित्र आहे.