लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शनिवारी ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट नोंदविण्यात आली. शिवाय लक्षणे असलेले रुग्णही घटत असून ही एक दिलासादायक बाब मानली जात आहे. दरम्यान, सलग नवे रुग्ण कमी व बरे होणारे रुग्ण अधिक अशी स्थिती कायम असल्याने जिल्ह्याला थोडा फार का होईना दिलासा मिळाला आहे.
शनिवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात १६ बाधितांचे मृत्यू झाले. गेल्या काही दिवसांपासून सरासरी २० ते २१ मृत्यू होत आहेत. मृत्यूच्या संख्येतही शनिवारी घट झाली. दुसरीकडे आता अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनबेड रिक्त राहत असल्याचेही दिलासादायक चित्र आहे. गेल्या महिनाभरापूर्वी मात्र, परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यात काहीशी सुधारणा झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी बेडची उपलब्धता आहे. आपत्कालीन कक्षात आता जास्त वेळ रुग्णांना वाट बघावी लागत नाही. शिवाय रुग्णालयातील गर्दीवरही नियंत्रण मिळविण्यात आले आहे. बेडसाठी येणारे कॉलही कमी झाल्याचे बेड मॅनेजमेंटचे म्हणणे आहे.
१५ एप्रिलनंतर प्रथमच घट
१५ एप्रिलनंतर रुग्णसंख्येत प्रथमच घट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात शनिवार १ मे रोजी ९३६ रुग्ण आढळून आले आहेत. १५ एप्रिलनंतर पुन्हा एक हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात येत होती ती पुढील १५ दिवस कायम होती. मे महिन्याच्या पहिल्याच दिवसाच्या अहवालातून काही सकारात्मक बाबी समोर आल्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे यंत्रणेवरील ताणही काहीसा कमी होत असल्याचे चित्र आहे. संशयित तसेच सारीने नियमित होणाऱ्या मृत्यूमध्येही शनिवारी घट झाली. शनिवारी अशा १० रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सरासरी १६ मृत्यू रोज नोंदविण्यात येत होते.
अतिदक्षता विभागात असलेले रुग्ण
शुक्रवारपर्यंत : ८४६
शनिवारी ८२०
ऑक्सिजनवरील रुग्ण
शुक्रवारपर्यंत १५३१
शनिवारी : १३३४
लक्षणे असलेले रुग्ण
शुक्रवारपर्यंत २९१७
शनिवारी : २७३२
सक्रिय रुग्ण
शुक्रवारपर्यंत १०६६१
शनिवारी : १०५२०