लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोना लस आल्याने एक दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, जानेवारीच्या पहिल्या १६ दिवसात ७३१ रुग्ण समोर आल्याने कोरोनाची भीती मात्र कमी झालेली नाही. यात डिसेंबरच्या तुलनेत अहवाल आणि बाधित यांची तुलना केली असता जानेवारीत हे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले आहे.
जानेवारीत चाचण्यांचे प्रमाण घटले असून त्या तुलनेत बाधितांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पंधरा दिवसात जळगाव शहरातच मोठी रुग्णवाढ समोर येत आहे. तालुक्यात कमी रुग्ण समोर येत असले तरी जळगाव शहरामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाने हाहाकार माजविल्यांनतर २०२१ मध्ये कोरोना लस दाखल होऊन अखेर कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. या नियोजनात आरोग्य यंत्रणा गुंतली असून गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण घटल्याचे चित्र आहे. ॲन्टीजनही अगदी कमी प्रमाणात होत असून त्यामुळे बाधितांची संख्याही कमी असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात केवळ १३ रुग्ण समोर आले होते.
जानेवारीत ४ टक्के बाधित
डिसेंबर महिन्यात एकूण झालेल्या चाचण्या आणि त्यात समोर आलेले कोरोना बाधित यांचे प्रमाण हे २.६१ टक्के आहे. शिवाय चाचण्यांचे प्रमाणही जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांपेक्षा डिसेंबरमध्ये अधिक होते. त्यामानाने जानेवारीच्या पहिल्या १६ दिवसांमधील चाचण्यांमध्ये ४. ७८ टक्के रुग्ण समोर आले आहेत. हे प्रमाण वाढले आहे. नोव्हेंबरमध्ये हेच प्रमाण एक टक्क्यावर पोहोचले होते.
जानेवारीतील स्थिती
१ जानेवारी - ६६
२ जानेवारी - २९
३ जानेवारी - २८
४ जानेवारी - ६१
५ जानेवारी - ५०
६ जानेवारी - ३५
७ जानेवारी - ५९
८ जानेवारी - ४२
९ जानेवारी - ५२
१० जानेवारी - ४१
११ जानेवारी - ५७
१२ जानेवारी - ५६
१३ जानेवारी - ३७
१४ जानेवारी - ७०
१५ जानेवारी - १३
१६ जानेवारी - ३५
डिसेंबर: रुग्ण- १,२३४
चाचण्या -४७,२०१
जानेवारी : रुग्ण - ७३१, चाचण्या - १५,२६६