सातगाव डोंगरी, ता. पाचोरा : खान्देशवासीयांची कुलस्वामिनी असलेल्या जोगेश्वरी देवीचे मंदिर खान्देश आणि मराठवाड्याच्या सीमेवर अजिंठा डोंगरमाथ्यावर आहे. येथे दर्शनासाठी असंख्य भाविक येतात.जोगेश्वरी मंदिर पाचोरा येथून २२ किमी तर सातगाव डोंगरी येथून चार किमी अंतरावर आहे. रविवारपासून नवरात्रोत्सवात जळगावसह धुळे, औरंगाबाद जिल्ह्यातून भाविक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी गर्दी करतात. ही देवी अनेक भाविकांची कुलस्वामिनी असल्याने यात्रोत्सवात देवीला पातळ नेसवून नवस फेडले जातात. विशेषत: सातव्या आणि नवव्या माळेला भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली असते.त्यामुळे परिसरातील छोटे व्यवसायिक यात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी तीन-चार दिवस आगोदरच आपल्या दुकानासाठी जागा आखून घेतात.इ.स.७९२ मध्ये राष्ट्रकूट तिसरा गोविंदराजा यांचा पुत्र अमोघवर्ष राष्ट्रकुटांच्या काळात हे मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते. येथे तत्कालीन शिलालेख असून, तो पाली भाषेत असावा, असा अंदाज आहे.