- स्टार : ७४७
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना महामारीने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. याचा परिणाम, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत पाहायला मिळत आहे. शिक्षण क्षेत्रातील प्री-प्रायमरी असलेल्या नर्सरी ते केजीचे चिमुकलेही यापासून सुटलेले नाहीत. नर्सरी व केजीमध्ये शिकत असलेले जिल्ह्यातील सुमारे अठरा ते एकोणवीस हजार विद्यार्थी यावर्षी कोरोनामुळे घरातच राहणार काय, अशी चर्चा होत आहे.
कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे आवडत्या सवंगड्यासोबत आपल्याला पुन्हा खेळायला मिळणार की नाही, या भावनेने बच्चे कंपनीचाही हिरमोड होताना दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात नर्सरी ते केजीच्या १९७ शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे अठरा ते एकोणवीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नर्सरी ते केजीपर्यंतचे चिमुकले मागील वर्षी घरातच राहिले. यावर्षी कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे चिमुकले घरातच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नर्सरी ते केजी शाळा चालविणाऱ्या अनेक संस्था चालकांमध्ये चिंतायुक्त वातावरण पसरले आहे. सर्वांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
--------------------------------
- पालक काय म्हणतात...
कोरोनामुळे वर्षभरापासून मुलं घरात आहेत. मन रमणारे सर्व पर्याय बंद झालेले आहेत. ऑनलाईन शिक्षण मुलांना मिळते. पण, मोबाईल, लॅपटॉप, टॅब याचे त्यांना व्यसन लागत आहे. त्यांच्या शैक्षणिक सत्राबाबत थोडीच चिंता वाटते. वयाने लहान असली तरी त्यांचा मूलभूत अभ्यासक्रम कच्चा राहू नये याची आम्हाला काळजी आहे. पाल्याचा घरी अभ्यास नियमित करून घेतला जातो.
- तनुजा देवरे
वर्षभरापासून कोरोनामुळे पाल्य घरातच आहेत. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण त्यांना मिळत आहे; मात्र त्यामुळे मोबाईलचे व्यसन लागत आहे. आरोग्यावरही परिणाम होत आहे.
- ज्ञानेश्वर पाटील
कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. पण, आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पाल्यास शाळेत कसे पाठविणार. मुलांची आरोग्याची काळजी हिच प्राथमिकता आहे.
- योगिता पवार
----------------------------
ही घ्या काळजी
शालेय शिक्षण बंद झाल्यामुळे मुलांमध्ये अनेक बदल झालेले आहेत. अशावेळी पालकांनी त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. घरातच असल्याने मुलांमध्ये चिडचिडपणा निर्माण होऊ शकतो. अशावेळी पालकांनी त्यांच्यासोबत अधिक वेळ घालविण्याची गरज आहे. त्यांच्या गरजा वयोमानानुसार थोडेफार बदल होत असतात. त्यांच्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.
-------------------------------
काय म्हणतात मुख्याध्यापक...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहे. परिणामी, प्रवेशासाठी यंदा खूप कमी विचारणा होत आहे. अन्यथा दरवर्षी सर्वाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेत होतात. विविध उपक्रम राबविले जात असल्यामुळे बालवाडीच्या विद्यार्थ्यांची संख्या चांगली असते. कोरोना कमी झाल्यानंतर शाळा सुरू झाल्यास, पालकही पाल्यास पाठविण्यास तयार आहेत.
- मुक्ता पाटील, मुख्याध्यापिका
-----------------------------
शहरातील नर्सरी टू केजी शाळा संख्या : १९७
विद्यार्थी संख्या (वर्षनिहाय)
२०१८-१९ : २५,७२७
२०१९-२० : २१,६०२
२०२०-२१ : १८,५००