जळगाव : शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षाची विद्यार्थिनी करुणा संतोष बोदडे (२२, रा. वढोदा ता.यावल, ह.मु. दीक्षितवाडी, जळगाव) हिने राहत्या खोलीमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. मैत्रिणी गावाकडे गेलेल्या असल्याने खोलीत एकटी असतानाच करुणाने हा टोकाचा निर्णय घेतला. ही धक्कादायक घटना रविवार, ७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मूळची यावल तालुक्यातील वढोदा येथील रहिवासी असलेली करुणा बोदडे ही विद्यार्थिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयात (नर्सिंग) पदव्युत्तरचे (जीएनएम) शिक्षण घेत होती. ती अन्य तीन मैत्रिणींसह दीक्षितवाडीमधील वानखेडे इमारतीमध्ये भाडे तत्वावरील खोलीत राहत होती. यामधील तीन विद्यार्थिनी सुटी असल्याने गावाकडे गेल्या होत्या.
खोलीवर एकट्याच असलेल्या करुणाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास जेवण केले त्यानंतर पाणी भरले, असे घरमालक महिलेने सांगितले. मैत्रिणीला दिसली गळफास घेतलेल्या अवस्थेतरविवारी संध्याकाळी करुणाची एक मैत्रिण जळगावात परतली, त्या वेळी तिने दरवाजा ठोठावला. मात्र बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने तिने घरमालक महिलेला सांगितले. त्यांनी खोलीच्या मागील दरवाजा उघडला असता करुणा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. या विषयी जिल्हापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.
दोन ओढण्यांनी घेतला गळफास
करुणाने गळफास घेण्यासाठी छताच्या ओकोड्याला दोन ओढण्या एकमेकांना बांधून गळफास घेतला. तसेच बाजूलाच गॅस सिलिंडर असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यावर उभे राहून तिने गळफास घेतल्याचा अंदाज आहे.
चार महिन्यांपूर्वीच साखरपुडा
करुणा हिचा चार महिन्यांपूर्वीच सुरत येथे होमगार्ड असलेल्या तरुणासोबत साखरपुडा झाला. त्यानंतर तिने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला.
मैत्रिणी, कुटुंबियांचा मोठा आक्रोश
या घटनेची माहिती मिळताच करुणा ज्या भागात राहत होती, त्या भागात मैत्रिणी आल्या. त्या ठिकाणी त्यांनी मोठा आक्रोश केला. तसेच संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मयत तरुणीचे कुटुंबीय रुग्णालयात आले. त्या वेळी त्यांनीही मोठा आक्रोश केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.