विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये सुट्टीच्या कालावधीत शालेय पोषण आहार शिजवण्याचा स्तुत्य उपक्रम शिक्षण विभागाने राबवलेला असला तरी विद्यार्थीच नसल्याने या योजनेची दैनावस्था झाली आहे. विशेष म्हणजे प्रशासन हजर आहे, मात्र लाभार्थीच नसल्याची वेगळीच गत या योजनेची गेल्या महिन्याभरात झालेली दिसून येत आहे.मुक्ताईनगर तालुका हा महसूल विभागांतर्गत दुष्काळी तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने विविध उपाययोजना व विविध शासकीय योजना लाभार्र्थींपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविणे.दुष्काळी तालुक्यांमध्ये सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबवली जात असताना मुक्ताईनगर तालुक्यातदेखील ही योजना राबवली जात आहे. मात्र योजनेचे लाभार्थी यासंदर्भात लाभ घेण्यापासून दूर राहत असल्याची वेगळीच बाब लक्षात येत आहे.सुट्टीचे दिवस वगळता २ मे २०१९ पासून ही योजना १३ जून २०१९ पर्यंत सर्व जि.प. शाळा, माध्यमिक शाळांमध्ये राबवली जात आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या शालेय पोषण आहार योजनेचा मात्र दुष्काळी तालुक्यातच फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे.मुक्ताईनगर तालुक्यात १२१ जि.प. शाळा,१६ माध्यमिक शाळा,१२ कनिष्ठ महाविद्यालये, २ वरिष्ठ महाविद्यालय, ३ आश्रमशाळा असून शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर असलेला मुक्ताईनगर तालुका आहे.त्यातील जि.प., माध्यमिक व आश्रम शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवला जाणार होता. मात्र २ मेपासून शाळेला सुट्टी लागल्यानंतर बहुतांशी शाळांमध्ये एकही विद्यार्थी शाळा आवारात फिरकत नसल्याने पोषण आहार शिजवायचा कोणासाठी? असा प्रश्न शालेय प्रशासनाला पडला आहे.मुक्ताईनगर तालुक्यात पहिली ते आठवीसाठी जवळपास सात हजार विद्यार्थी हे शालेय पोषण आहारासाठी लाभार्थी आहेत..मात्र एकही विद्यार्थी शाळेच्या आवारात फिरकत दिसून येत नाही. प्रत्येक शाळेमध्ये प्रशासनातर्फे मुख्याध्यापकांमार्फत एका शिक्षकाची नेमणूक केलेली आहे. नेमणूक केलेले शिक्षक, पोषण आहार शिकवणारे कर्मचारी हे शाळेत जरी हजर राहत असले तरी विद्यार्थीच नसले तर पोषण आहार शिजवायचा कुणासाठी? असा खरा प्रश्न निर्माण होत आहे.यासंदर्भात मुक्ताईनगर तालुक्यातील विविध माध्यमिक व जि.प. शाळांमध्ये भेटी दिल्या असता सकाळी १० वाजेपर्यंत शिक्षक व शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या अंगणवाडी, बचत गटात योजनेच्या महिला किंवा अन्य महिला या शालेय आवारात दिसतात. मात्र विद्यार्थीच येत नसल्याने पोषण आहार शिजवायचा कशासाठी? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडतो. त्यामुळे ही योजना बारगळली यातच जमा आहे.शिक्षकांकडून पुरेशी जागृतीदुष्काळी तालुक्यांमध्ये योजनेसंदर्भात जनजागृती ही शिक्षकांनी शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच नियोजनपूर्वक केलेली असली तरी विद्यार्थी मात्र यासंदर्भात जागरूक नाही, ही बाब तेवढेच सत्य आहे. एका अर्थाने ‘प्रशासन आहे मात्र लाभार्थीच नाही’ अशी विचित्र गत या योजनेची झाली आहे.मुक्ताईनगर तालुक्यात शालेय पोषण आहार देण्यासंदर्भात सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षकांच्या पाळ्या लावण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थीच येत नसल्याचे दुर्दैव आहे. मेहुण (कासा) सारख्या शाळेत मात्र दहा ते बारा विद्यार्थी हजर राहतात, ही मात्र तेवढीच आशेचे किरण असलेली बाब आहे.-विजय सरोदे, गटशिक्षणाधिकारी, मुक्ताईनगर.उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आपल्याकडे पाचवी ते आठवीच्या एकूण २६ तुकड्या असतानादेखील विद्यार्थ्यांची उपस्थिती शून्य असल्याने शालेय पोषण आहार कोणासाठी शिजवावा, हाच प्रश्न पडत आहे.-आर.पी.पाटील, मुख्याध्यापक, जगजीवनदास इंग्लिश स्कूल, मुक्ताईनगर.
पोषण आहाराबाबत उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 4:48 PM
दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये सुट्टीच्या कालावधीत शालेय पोषण आहार शिजवण्याचा स्तुत्य उपक्रम शिक्षण विभागाने राबवलेला असला तरी विद्यार्थीच नसल्याने या योजनेची दैनावस्था झाली आहे.
ठळक मुद्देप्रशासन आहे मात्र लाभार्थीच नाहीमुक्ताईनगर तालुक्यातील अशीही स्थिती