ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.2 - भुसावळ तालुक्यातील गोजोरे व कु:हे पानाचे येथील शालेय पोषण आहाराचे नमुने घेतल्यानंतर शिक्षण विभागाने शनिवारी जिल्हा परिषद सदस्यांसह पाळधी येथील पोषण आहाराच्या गोदामाची पाहणी केली़ दोन्ही ठिकाणच्या नमुन्यांमध्ये तफावती आढळून आल्या असून पुरवठादाराने रात्रभरात गोदामातील माल बदलला असल्याचा संशय जि़प़सदस्यांनी व्यक्त केला आह़े शुक्रवारी व शनिवारी घेतलेले नमुने तपासणीसाठी अन्न व औषध विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत़
जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केलेल्या तपासणीत शालेय पोषण आहार निकृष्ट असल्याचे आढळून आले होत़े त्यानंतर त्यांनी याबाबत सीईओ कौस्तुभ दिवेगावकरांकडे तक्रार केली होती़ तक्रारीनंतर शिक्षण विभागाने गोजोरे व कु:हे येथील पोषण आहाराचे नमुने ताब्यात घेतले होत़े शनिवारी सीईओ यांच्या आदेशानुसार प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी डी़एम़देवांग यांनी साई मार्केटिंग अॅण्ड ट्रेडिंग कंपनी या पुरवठादाराच्या पाळधी येथील गोदामामधून पोषण आहाराचे नमुने घेतल़े यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण सभापती पोपट भोळे, जि़प़सदस्य पल्लवी सावकारे, सदस्य गजेंद्र सोनवणे, सदस्य नानाभाऊ महाजन, सदस्या माधुरी अत्तरदे उपस्थित होत्या.
दोन्ही ठिकाणच्या नमुन्यांमध्ये तफावत
शिक्षण विभागाने पाळधी येथील गोदामातून मुंगदाळ, वटाणा, तुरदाळ, मटकी या आहाराचे नमुने घेतल़े गोजोरे व कु:हे येथून घेतलेल्या व गोडाऊनमधील नमुन्यांमध्ये तफावती आढळून आल्या़ गोडाऊनमधील नमुने निकृष्ट नसल्याचे जि़प़सदस्यांनी सांगितल़े मात्र चांगला माल गोडाऊनमध्ये ठेवून शाळांमध्ये निकृष्ट आहार आढळून आल्याने मक्तेदाराने शिक्षण विभागाची तपासणीची कुणकुण लागल्याने रात्रभरात माल बदलला असल्याचा संशय सदस्या पल्लवी सावकारे, सदस्य नानाभाऊ महाजन यांनी व्यक्त केला आह़े