लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने घालून दिलेले नियम पाळून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमत्त घरीच थांबून वंदन करावे, असे आवाहन विविध संघटनेच्या प्रमुखांनी केले आहे. यात रिपाइं आठवले गटाकडून रक्ताचा तुडवड लक्षात घेता काही भागांमध्ये १४ एप्रिल रोजी सर्व नियम पाळून रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.
यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्याने कार्यक्रमांचे आयोजन केलेले नसून सर्वांनी बाबासाहेबांना घरीच थांबून, बाबासाहेबांचा एखादा ग्रंथ वाचून त्यांना अभिवादन करावे, असे आवाहन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले आहे. आम्ही याबाबत आधीच सोशल मीडियावर आवाहन केले आहे. नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गर्दी करू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
रक्तदान शिबिर
समतानगर, हुडको, वाघनगर, खंडेरावनगर आदी भागात रिपाइं आठवले गटाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी दिली. नागरिकांनी कायद्याचे पालन करून, शासनाचे नियम पाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरी थांबून अभिवादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.