लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बीएचआर मल्टिस्टेट पतसंस्थेचे नवनियुक्त अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे (रा. नागपूर) सोमवारी पतसंस्थेत दाखल झाले खरे; परंतु पहिल्याच दिवशी त्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. कार्यालय सील केलेले असल्याने बाहेरच सुरक्षा रक्षकांच्या दालनात त्यांना थांबावे लागले. इतकेच काय पदभार स्वीकारल्याबाबतचे पत्रही बाहेर जाऊनच तयार करावे लागले.
बीएचआरच्या ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, सीए महावीर जैन, विवेक ठाकरे यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात छापेमारी करून बीएचआरच्या मुख्य कार्यालयातून कागपदपत्रे, संगणक, हार्डडिस्क यासह जवळपास तीन ट्रक भरून साहित्य नेले होते. तेव्हाच हे कार्यालय सील करण्यात आले होते. गेल्या आठवड्यातच केंद्रीय सहकार व कृषी विभागाने नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्याचे सहायक निबंधक चैतन्य नासरे यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार नासरे सोमवारी जळगावात दाखल झाले. मुख्य कार्यालयात गेल्यावर तेथील कार्यालय सील असल्याने आतमध्ये प्रवेश करता आला नाही. संस्थेचे आस्थापना प्रमुख प्रमोद माळी, वसुली अधिकारी सुरेश सपकाळे व सुनील पाटील यांच्याशी त्यांनी बाहेरच सुरक्षा रक्षकांच्या दालनात चर्चा केली.
संस्थेचे केले व्हिडिओ चित्रण
संस्थेचे मुख्य कार्यालय सील असल्याने नासरे यांनी कार्यालयाचे व्हिडिओ चित्रण केले. वीज बील थकीत असल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. सहकाऱ्यांना सोबत घेऊन संस्थेच्या लवादाकडे जाऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला. पदभार स्वीकारल्याबाबत केंद्रीय सहकार निबंधक यांना पाठवायच्या अहवालाचे पत्रही त्यांनी बाहेरूनच तयार केले. दुपारी तीन वाजता नासरे कार्यालयात आल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.
सील उघडण्यासाठी कोर्टात जाणार
पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच हे कार्यालय सील केलेले आहे. पुण्याच्या विशेष न्यायालयात हे प्रकरण सुरू असल्याने तेथील न्यायालयात सील उघडण्याबाबत अर्ज केला जाणार असल्याची माहिती नासरे यांनी दिली. दरम्यान, सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतनही थकीत झाले आहे. या साऱ्या प्रक्रियेला एक किंवा दोन आठवडेही लागू शकतात.
--