लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाने कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची मुभा दिली असली तरी अनेक पॉझिटिव्ह रुग्ण सर्रासपणे बाहेर फिरून कोरोना वाटत फिरत असल्याची धक्कादायक स्थिती ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.
लोकमत च्या टीमने अभियांत्रिकी महाविद्यालयातील तपासणी केंद्रावरून बाधित झालेल्या रुग्णांचा विशेष करून ज्या रुग्णांना मनपा प्रशासनाने विलगीकरणची सूट दिली अशा रुग्णांचा काहीवेळ पाठलाग करून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनेक रुग्ण पॉझिटिव्ह असतानाही थेट घरी न जाता आधी मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला खरेदी, पेट्रोल पंप अशा ठिकाणी जाऊन कोरोनाचा संसर्ग वाढवीत असल्याचे निदर्शनास आले. तर काही ग्रामीण भागातील बाधित व्यक्ती महापालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेताच, पॉझिटिव्हचा रिपोर्ट घेऊन थेट घरी रवाना झाल्याचेही पहावयास मिळाले. अशा बेजबाबदार नागरिकांमुळे शहरात व जिल्हाभरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.
घरी जाताना केली फळांची खरेदी
अभियांत्रिकी महाविद्यालयातून एक दाम्पत्य पॉझिटिव्ह आल्यानंतर, संबंधितांनी थेट कोरोना सेंटरमध्ये भरती न होता महाविद्यालयातून बाहेर पडले, तसेच ख्वाॅजामिया चौकातून एका फळ विक्रेत्याकडून काही फळांची खरेदी केली. यासह एका मेडिकल स्टोअरवर जाऊन काही औषधी देखील घेतली. यानंतर संबंधित दाम्पत्य एकाच मोटरसायकल वरून खोटे नगर भागातील त्यांचा घरी परतले. या दाम्पत्याने मास्क लावला असला तरी संबंधित व्यक्तीमुळे फळ विक्रेत्याला व मेडिकल स्टोअर्स वरील एका व्यक्तीला कोरोना होण्याची भीती वाढली आहे.
निगेटिव्ह असलेल्या मित्रासोबत झाला रवाना
अभियांत्रिकी महाविद्यालयात एक तीस वर्षाचा युवक कोरोना बाधित आला. या युवकाने देखील कोरोना सेंटरमध्ये भरती न होता आपल्या निगेटिव्ह असलेल्या मित्राला बोलावले. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळता थेट त्या मित्राच्या मोटारसायकलवरून दोघेही जण रवाना झाले. तसेच एका दुधाच्या बूथवर देखील दोन्ही मित्र थांबले. त्याठिकाणी कोरोना बाधित युवकाचे काही मित्र देखील त्यावेळी जमा झाले. सुमारे अर्धा तास संबंधित युवक बाधित असतानादेखील त्या दुधाच्या बूथवर थांबून होता.
या बेजबाबदारांना कोण आवरणार
- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, जिल्हा व मनपा प्रशासनाने रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळावे यासाठी तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. मात्र नागरिकच बेजबाबदारपणे वागत असतील तर लॉकडाऊन जाहीर केल्यावर देखील फारसा उपयोग होणार नसल्याचे पहावयास मिळत आहे.
- आरटीपीसीआरची चाचणी केल्यानंतर दोन दिवसानंतर अहवाल प्राप्त होतात. मात्र अहवालाची प्रतीक्षा न करताच अनेकजण तपासणी केल्यानंतर घरी न थांबता थेट बाहेर फिरतात. यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे.
- मनपा प्रशासनाने अशाप्रकारे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काही पथके नेमली आहेत. मात्र, या पथकांकडून देखील अशा बेजबाबदार नागरिकांना आवर घालण्यास अपयश येत आहे. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
एकूण रुग्ण
८६ हजार ६८८
बरे झालेले रुग्ण
७३ हजार ६६५
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण
११ हजार ४२६
गृह विलगीकरण असलेले रुग्ण
७ हजार १११