जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते शिरसोली दरम्यान सध्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे; मात्र या मार्गाला शिव कॉलनी उड्डानपुलाच्या खाली जागा नसल्यामुळे, रेल्वे प्रशासनातर्फे तिसरा रेल्वे मार्ग जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी १२ आणि १७ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे दोन वर्षांपूर्वी जळगावातील पिंप्राळा रेल्वे गेटपासून तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, शिरसोलीपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर विद्युतीकरण करणे, सिग्नल यंत्रणा उभारणे व मुख्य म्हणजे शिवकॉलनी उड्डाणपुलाच्या खाली तिसरी रेल्वे मार्गाचे रूळ टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे हे काम रखडले आहे. या पुलाच्या खाली असलेल्या जागेत एक मुंबईकडे जाणारा आणि दुसरा मुंबईकडून येणारा (अप आणि डाऊन) असे दोनच मार्ग आहेत. दोन्ही बाजूने तिसऱ्या रेल्वे मार्गाचे रूळ टाकण्यासाठी जागा नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम या ठिकाणी रखडले होते. त्यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या रेल्वे मार्गाला मुख्य रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी रूळ जोडणीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना तिसऱ्या रेल्वे मार्गावरूनही जाता येणार आहे.
इन्फो :
१२ आणि १७ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक :
तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या या महत्त्वाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे १२ आणि १७ ऑगस्ट रोजी प्रत्येकी ५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यात १२ रोजीचा मेगाब्लॉक हा सकाळी पावणे आठला सुरू होऊन, दुपारी पाऊणपर्यंत राहणार आहे. या मेगाब्लॉकच्या काळात सुरत-मुंबईकडून येणाऱ्या गाड्या विविध स्टेशनवर अर्धा ते एक तासापर्यंत थांबविण्यात येणार आहे. यात भागलपूर-सुरत एक्स्प्रेसही दहा मिनिटे जळगाव स्टेशनवर थांबविण्यात येणार आहे. तसेच (गाडी क्रमांक ०२१०३) गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी एक तास शिरसोली स्टेशनवर तर गाडी क्रमांक (०२१६५) एलटीटी -गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडीही एक तास म्हसावद स्टेशनला थांबविण्यात येणार आहे, तसेच हावडा एक्स्प्रेस माहेजी स्टेशनला तर कर्नाटक एक्स्प्रेस व काशी एक्स्प्रेस पाचोरा स्टेशनवर थांबविण्यात येणार आहे.
तर १७ रोजीच्या मेगाब्लॉकमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या भुसावळ व सावदा या स्टेशनवर थांबविण्यात येणार आहेत.
इन्फो :
तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी शिवकॉलनी उड्डाणपुलाच्या खाली पुरेसी जागा नाही. त्यामुळे या ठिकाणी तिसरा रेल्वे मार्ग मुख्य रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी कट आणि कनेक्शनचे तांत्रिक काम हाती घेण्यात येणार आहे. उपलब्ध असलेल्या जागेत तिसऱ्या मार्गाचे रूळ टाकून हा मार्ग मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार आहे.
पंकज डावरे, उप मुख्य अभियंता, भुसावळ विभाग.