तालुक्यातील बहुतांश गावांना सिटीसर्व्हे झालेले आहेत. यात पिंपळगाव हरे, शिंदाड, लोहारा, नगरदेवळा, लोहटार, नांद्रा, सामनेर, बांबरूड प्र. बो., कळमसरे, सातगाव, लोहारी यासह कुरंगी, डोकलखेडे, दहिगाव, माहेजी, खडकदेवळा आदी गावांतील काही रहिवासोपयोगी मिळकती शासनाने नागरिकांना अटी, शर्तीवर दिलेल्या आहेत. त्यांना सत्ता प्रकार ‘ब’ असे वर्गीकरण करून नावे दाखल आहेत.
या मिळकतीच्या हस्तांतरणास प्रत्येकवेळी बाजारभावाच्या किमतीच्या ५० टक्के नजराणा रक्कम भरून उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. तसेच भोगवटा वर्ग-२च्या शेत मिळकतीदेखील अशाच प्रकारे असल्याने नागरिकांना, मिळकतधारकांना हस्तांतरण करतेवेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडून त्रास होत होता. शासनाने अशा मिळकतीचे एकाच वेळी रेडिरेकनर बाजारभावाच्या ५० टक्के नजराणा रक्कम घेऊन कायमस्वरूपी मिळकतधारकला अटी, शर्ती काढून वर्ग १मध्ये रूपांतर करण्याचा आदेश २८ मार्च २०१९ला काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यास अनुसरून राज्य सरकारने १५ मार्च २०२१ला आदेश जारी केला असून, आता त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.
दि ५, ६ व ७ जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात हे शिबिर होणार आहे. ब सत्ता प्रकार व भोगवटा वर्ग २च्या मिळकतधारकांनी आपली प्रकरणे कोरोनाचे निर्बंध पाळून या दिवशी पाचोरा प्रांत कार्यालयात येऊन दाखल करावीत. ही सर्व प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून पुढील आदेश झाल्यानंतर बाजारभावाच्या ५० टक्के रक्कम शासनास भरून कायमस्वरूपी मिळकती भोगवटा वर्ग १ मध्ये करून निर्बंध मुक्त होतील. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.
मिळकतधारकांनी मंडळनिहाय दि. ५ जुलै रोजी पाचोरा, वरखेडी, गाळण, नगरदेवळा, दि. ६ जुलै रोजी नांद्रा, पिंपळगाव हरे, कुऱ्हाड, दि. ७ जुलै रोजी भडगाव तालुक्यातील सर्व प्रकरणे याच दिवशी ११ ते ४ ह्याच वेळेत सादर करावीत.