लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या १६ अव्यावसायिक मार्केटमधील १५०० गाळेधारकांनी मनपा प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात गेल्या पंधरा दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. गाळेधारकांचा पंधरा दिवसांपासून संप सुरू असतानादेखील मनपा प्रशासन गाळेधारकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने आता गाळेधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आत्मदहनासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. याबाबत बुधवारी गाळेधारक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राजस कोतवाल, संजय पाटील, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, वसीम काझी, रमेश तलरेजा, हेमंत परदेशी, संजय अमृतकर, सुजित किनगे, रिजवान जागीरदार, प्रकाश गगनानी, शिरीष थोरात, शंकर रामचंदानी, राजेश समदाणी व गाळेधारक उपस्थित होते. बुधवारी गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे यांच्या उपस्थितीत सर्व १६ अव्यावसायिक, अविकसित मार्केटचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत गाळेधारकांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
आता आत्मदहनाशिवाय कोणताही पर्याय नाही
गेल्या वर्षापासून सर्व व्यापारी कोरोनासारख्या महामारीला तोंड देत आहेत. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे साधारणतः १२० दिवस शहरातील व्यवसाय धंदे बंद होते व आताही तिच कोरोनाची परिस्थिती उद्भवलेली असताना मनपा प्रशासनाची मनमानी भूमिका बदललेली नाही. आमच्या कुवतीनुसार कर्ज काढून थोडे थोडे पैसे भरूनही आम्हाला आमचे गाळे परत मिळणार याची शाश्वती नाही. प्रचंड भय,तणाव व आर्थिक संकटात सापडलेला गाळेधारक लाखोंची बिले भरू शकणार नाही. परिवाराला दोन घास खाऊ घालता येईल की नाही या विवंचनेत असलेल्या गाळेधारकांना मनपा प्रशासन लाखो रुपयांच्या वसुलीसाठी धमकावत आहे. त्यामुळे आता आत्मदहनाशिवाय मार्ग राहिलेला नाही, अशी भूमिका गाळेधारकांनी बुधवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केली.
घर विक्री करूनही आम्ही मनपाची रक्कम भरू शकणार नाही
महानगरपालिकेकडून अन्यायकारक भाड्याची मागणी गाळेधारकांकडे केली जात आहे. इतकी रक्कम गाळेधारक आपले घरदार विकूनसुद्धा भरू शकत नाही, त्यामुळे महापालिका प्रशासनाने गाळेधारकांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, मनपा प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच कुटुंबासोबतच सर्व गाळेधारक आत्मदहन करतील, असा इशारादेखील गाळेधारक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील निवेदन देण्यात येणार असून, या काळात कोणतेही गाळेधारकांचे काहीही बरेवाईट झाल्यास किंवा कोणत्याही गाळेधारकाने आत्महत्या केली किंवा त्याचा जीव गेल्यास त्याला सर्वस्व महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, असेही गाळेधारकांतर्फे सांगण्यात आले.