अपघाती क्षेत्र
हरताळा फाटा ते कोथळी बायपासजवळ असलेली ओडीएची जुनी पाइपलाइन ही जीर्ण झाल्यानंतर तेथे ओडीएकडून नवीन पाइपलाइन टाकण्यात आली. सुमारे ५०० मीटरच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणारा सर्व्हिस रोड हे अपघाती क्षेत्र ठरत आहे.
सर्व्हिस रोडमुळे काम थांबवले
दोन्ही बाजूने महामार्गाची वाहतूक सुरळीत सुरू असताना येथे मात्र महामार्गाचे काम हे सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण असल्यामुळे थांबविण्यात आले आहे. त्यात ओडीएची जुनी पाइपलाइन अडथळा ठरून जीवघेणी ठरत आहे.
पाइपलाइनचा अडथळा
जवळपास टेकडीच्या बाजूने सर्व्हिस रोडचे फलक लावण्यात आले आहेत. येथील मार्गाने वाहने सुसाट जात असताना पुढे अचानक सर्व्हिस रोड थांबून ओडीए पाइपलाइनचा अडथळा निर्माण होतो. परिणामी अचानक वाहनचालकाच्या लक्षात आल्याने तो पुन्हा मागे फिरून त्याचे वाहन वळवून पुन्हा त्याला मार्गस्थ व्हावे लागते. त्यामुळे दिवसासोबतच रात्रीच्या अंधारामध्ये सर्व्हिस रोड दिसेनासा होतो. त्यामुळे पुढील ओडीएच्या पाइपलाइनचा अडथळा निर्माण होऊन मोठा अपघात होण्याची भीती वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.
दोन-अडीच किलोमीटरचा फेरा
अनेकवेळा बाहेरून आलेला वाहनचालक येथे बुचकळ्यात पडून दोन-अडीच किलोमीटरचा फेरा घेऊन मार्गस्थ होतो.
मागील वाहन आदळण्याची भीती
कोथळी बायपासकडे वाहन वळण घेताना अरुंद खिंडारजवळ वाहन अचानक हळू होते त्यावेळी मागील वाहन आदळण्याची भीतीही व्यक्त होत आहे. अनेक वेळा येथे वाहनांची रांग लागते आणि वाहतूक कोंडी होत असते.
नवीन पाइपलाइनचे काम पूर्ण करावे
येथे महामार्ग कंपनीमार्फत गिट्टी टाकून अर्धवट रस्ता करण्यात आला आहे. परंतु त्यासाठी येथील नवीन पाइपलाइनचे काम पूर्ण करून अडथळा दूर करावा, अशी आशा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.
दिशादर्शक फलक हवे
येथे कोथळी बायपासकडे वळण्यासाठी कोणताही दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे वाहनचालक गोंधळात पडतात. ओडीएच्या जुन्या पाइपलाइनचा अडथळा त्वरित दूर करून वाहनचालकांची गैरसोय दूर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोट
ओडीएची जुनी पाइपलाइन काढून नवीन पाइपलाइन काढण्यासाठी परवानगी मागितली होती. ती संबंधित विभागाकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही परवानगी दिली आहे. महामार्गात अडथळा ठरणारी ओडीएची ही पाइपलाइन गेल्या वर्षीच नवीन करण्यात आली. तेवढेच काम बाकी आहे.
-व्ही.बी. तायडे, कनिष्ठ अभियंता, ओडीए, मुक्ताईनगर
कोट
महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही बाजूंनी वाहने सुरळीत जात आहे. ओडीए नवीन पाइपलाइन जोडणे येथे बाकी आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कुशल कामगारांमार्फत काम करण्यात येणार आहे. कनेक्शन जोडणी बाकीमुळे महामार्गावरील रस्त्यास अडथळा होत आहे. लवकरच अडथळा दूर करून चौपदरीकरण आतील महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्यात येईल.
- अरुण सोनवणे, अभियंता, ‘नाही’ (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण)