अमळनेर (जळगाव) : दाजीबा नगरमधील अक्षय राजू भिल (२२) याच्या खुनाच्या निषेधार्थ तालुक्यातील भिल्ल समाज एकवटला व आरोपींना आमच्यासमोर हजर करा, फाशी द्या , एनकाउंटर करा... अशी मागणी करीत मंगळवारी दुपारी अमळनेरात तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्याना अडवत किरकोळ दगडफेक केली. तसेच चार ठिकाणी टायरही जाळण्यात आले.
विविध संघटना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावरही आंदोलनकर्ते ऐकण्यास तयार नव्हते. अखेरीस चार पाच जणांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी आरोपी अटक केल्याचे दाखवले. यानंतर आंदोलनकर्ते माघारी परतले. अक्षय याचा सोमवारी रात्री किरकोळ कारणावरुन खून झाला होता. यात रोहित चरण सरोदे उर्फ सोत्रे (१९), राहुल नाना सोत्रे (२३), अर्जुन नाना सोत्रे (२५) आणि नीता चेतन सोत्रे (४५) यांना चितोड ता. धुळे येथून तर आरती ज्ञानेश्वर सोत्रे (४८) हिला अमळनेरातून अटक करण्यात आली.