जामठी, ता.बोदवड : वीजपुरवठ्याच्या थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने ग्राम पंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही आकडे टाकून अवैध वीजपुरवठा घेतल्याप्रकरणी वीज कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा पोलिसात दाखल केला आहे. एखाद्या ग्रामपंचायतीविरुद्ध अशी कारवाई होण्याची संपूर्ण बोदवड तालुक्यातील ही पहिली घटना आहे.वीज वितरण कंपनीने जामठी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा २० सप्टेंबर रोजी खंडित केला. यानंतर ग्रामपंचायतीने वीज वितरण कंपनीची परवानगी न घेता, वीज तारांवर आकडे टाकले व पाणीपुरवठा योजनेसाठी विजेचा वापर सुरू केला. ही बाब वीज वितरण कंपनीच्या स्थानिक यंत्रणेस समजली.यानंतर वीज वितरण कंपनीच्या वतीने येथील पॉवर हाऊसिंग योजनेच्या विहिरीवरील वायर, स्टार्टर, पेज आदींसारखे साहित्य जप्त करून वीज कंपनीच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद वीज कंपनीचे सहायक कार्यकारी अभियंता प्रफुल्ल आर.कोकाटे यांनी दिली. त्यावरून यावल पोलिसात भा.दं.वि. कलम १३५ अन्वये पदस्थ सरपंच कमलाबाई माळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासूनची ही विजेची थकबाकी आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासन ही थकबाकी भरण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे तडजोड करण्यासाठी तयार आहे. जामठी येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या जागेपोटीचा करदेखील वीज वितरण कंपनीकडे थकीत आहे. तो भरण्यासाठी वीज कंपनीला यापूर्वीच सूचित केले आहे.-कमलाबाई माळकर, सरपंच, जामठी
जामठी येथे अवैध वीज कनेक्शनमुळे ग्रा.पं.विरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 5:19 PM
वीजपुरवठ्याच्या थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने ग्राम पंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही आकडे टाकून अवैध वीजपुरवठा घेतल्याप्रकरणी वीज कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा पोलिसात दाखल केला आहे.
ठळक मुद्देथकबाकीमुळे वीज कंपनीने वीजपुरवठा केला होता खंडितआकडे टाकून सुरु केला होता अवैध वीज पुरवठावीज कंपनीने दिली पोलिसात फिर्याद