आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : : शहरातील संवेदनशील भाग म्हणून तांबापुराची ओळख आहे. किरकोळ कारणावरुन या परिसरात दंगली उसळून संचारबंदी लावण्यात आल्याचा इतिहास आहे, असे असतानाही या परिसरात गेल्या काही दिवसापासून आक्षेपार्ह फलक, बॅनर व भींतीवर लिहिलेला मजकूर झळकत आहे. फलक व भींतीवरील मजकूर हा देश व राज्य पातळीवर गाजत असलेल्या विषयाशी संबंधित आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलीस व मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते, असा सूर सध्या शहरात उमटत आहे.फलकावर वादग्रस्त मजकूरशिरसोली नाकाकडून इच्छादेवी चौकाकडे जात असताना डाव्या बाजुच्या भींतीवर व श्यामा फायर संकुलाच्या समोर मेहरुणकडे जाणाºया रस्त्यावरील विजेच्या खांबावर हे वादग्रस्त फलक लावण्यात आले आहेत. सध्या राष्टÑीय व आंतरराष्टÑीयस्तरावर चर्चेचा विषय ठरलेल्या विषयाशी निगडीत हे फलक लावण्यात आले असून त्यावर काही छायाचित्रही आहेत. आक्षेपार्ह मजकूरामुळे दोन गटात मोठा वाद होऊ शकतो असा हा मजकूर आहे. आधीच या विषयावर देशात वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत.विना परवानगी लागले फलक?मिळालेल्या माहितीनुसार हे फलक मनपाची परवानगी न घेताच लावण्यात आले आहेत. या परिसरात राष्टÑपुरुषाचा पुतळा देखील आहे. या फलकावर भावना दुखावणारा मजकूर असल्याने या भागात केव्हाही ठिणगी पडू शकते, तसे झाले तर कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी वेळ येण्याआधीच मनपा व पोलीस प्रशासनाने हे फलक हटवावे व भींतीवरील वादग्रस्त मजकूर देखील काढावा, असा सूर उमटत आहे.
सहा वर्षात दोन वेळा दंगल अन् संचारबंदीतांबापुरात दंगलीचा इतिहास आहे. जानेवारी २०१२ मध्ये दोन गटात मोठी दंगली उसळली होती. त्यानंतर २०१४ मध्ये मकरसंक्रातीलाच दंगल उसळली होती. या दंगलीत तत्कालिन पोलीस निरीक्षक बी.के.कंजे, उपनिरीक्षक डी.डी.इंगोले या दोन अधिकाºयांसह काही कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्यावतीने संचारबंदी लावण्यात आली होती.
पोलीस चौकी असून उपयोग काय?तांबापुरा हा परिसर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. जिल्ह्यातील संवेदनशील भागाच्या नकाशावर अग्रस्थानी असलेल्या या परिसरात आतापर्यंत अनेकदा दंगली उसळल्या आहेत. तसेच नेहमीच या भागात किरकोळ कारणावरुन मोठे वाद निर्माण होतात. त्यामुळे तांबापुरा व इच्छादेवी चौक या परिससरात स्वतंत्र पोलीस चौकी निर्माण करण्यात आली आहे. त्याशिवाय बीट मार्शल यांचा वावर या भागात सतत असतो. डोळ्यात तेल घालून या परिसरात यंत्रणेचे लक्ष असते. असे असतानाही वादग्रस्त फलक झळकूनही त्याची पोलिसांकडून तसेच मनपाकडून कोणतीही कारवाई होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.