विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे एका जणाला चांगलेच महागात पडले असून त्याला जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या पोस्टमुळे सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शाहूनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली.
एका धार्मिक स्थळाविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायर झाल्यामुळे शाहूनगरात सोमवारी रात्री जमाव जमला होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होते. याची माहिती मिळताच मिळतात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, शहर व जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल व अनिल भवारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाची समजूत काढली. यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी नागरिकांना शांततेसह अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित हे जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पोहोचले. याठिकाणी एका गटाकडून त्यांना निवेदन देवून संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शहरात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मिरवणूक सुरू असताना दुसरीकडे हा वाद उद्भवल्याने काही अनर्थ घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी संबंधितांना योग्य त्या कारवाईच्या सूचना दिल्या.