भगीरथ माळी
धरणगाव(जि. जळगाव) : धरणगाव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत मंत्री गुलाबराव पाटील व गुर्जर समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. याप्रकरणी युवा सेनेचे महाराष्ट्र प्रचारक शरद कोळी यांच्याविरुद्ध गुरुवारी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवसेना (उबाठा) पक्षाच्यावतीने धरणगावात मंगळवारी उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा झाली. यात बोलताना कोळी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व गुर्जर समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले. यामुळे गुर्जर समाजात संतापाची लाट पसरली आहे. याबाबत धरणगाव व पाळधी येथील पोलिसांना निवेदनही देण्यात आले.
यात म्हटले आहे की, या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कोळी यांच्यावर कारवाई करावी. तसेच या प्रकाराविरुद्ध गुज्जर स्नेहवर्धक मंडळ समाजाच्यावतीने जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. सपोनि जिभाऊ पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले. दरम्यान, समाजाचा वाढता दबाव लक्षात घेता कोळी यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.