ग्रामस्थांचे हाल : लोकप्रतिनिधींची चालढकल वृत्ती कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : गावात सर्व धर्मीयांसाठी एकही अधिकृत स्मशानभूमी अस्तित्वात नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावर रस्त्यालगतच्या अस्वच्छ जागी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा प्रश्न न सोडविता लोकप्रतिनिधींनीही चालढकल वृत्ती कायम ठेवली असून, त्याबद्दल सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सुमारे १५ हजारांवर लोकसंख्या असलेल्या ममुराबाद येथे आजच्या घडीला वापरात असलेली एकही अद्ययावत स्मशानभूमी नाही. त्यामुळे ग्रामस्थ गावालगतची शेती तसेच जळगाव तसेच विदगाव रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेतच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून वेळ निभावताना दिसत आहेत. उन्हाळ्यात व हिवाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कारात फार अडचणी येत नसल्या तरी खरे हाल पावसाळ्याच्या दिवसात सुरू होतात. कारण, पाऊस सुरू असल्यास उघड्यावरील अंत्यसंस्काराला मर्यादा येतात. बऱ्याचवेळा ओली लाकडे सहज पेट घेत नसल्याने मोठे रबरी टायर्स तसेच रॉकेल, मीठ यांचा भरमसाठ वापर करावा लागतो. इतके करूनही पाऊस सुरूच राहिल्यास मृतदेह अर्धवट जळण्याचे प्रकार घडतात. याशिवाय चिखलामुळे सगळीकडे प्रचंड अस्वच्छता निर्माण झाल्याने मृतांच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांना खूप हाल सहन करावे लागतात. पाऊस थांबायचे नावच घेत नसल्यास मृतदेह बराचवेळ घरात ठेवण्याचा बाका प्रसंग अनेकांवर अधूनमधून गुदरतो. काहीजण नाइलाज म्हणून मृतदेह मालवाहू वाहनात कोंबून अंत्यसंस्कारासाठी जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीत घेऊन जातात. तिथेही काहीवेळा जागा नसल्यास ताटकळावे लागते. प्रसंगी घरून कोरडी लाकडे न्यावी लागतात. या सर्व प्रकाराबद्दल नेहमीच तीव्र नाराजीचा सूर उमटत असताना ग्रामपंचायत प्रशासनाने स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे अजूनही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. निव्वळ हक्काची जागा नाही म्हणून रखडलेला स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याची मानसिकता कोणातच दिसून आलेली नाही. वित्त आयोगातून जागा अधिग्रहित करून स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-----------------------
फोटो-
ममुराबाद येथे अधिकृत स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांना असे उघड्यावर रस्त्यालगत अस्वच्छ जागी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. (जितेंद्र पाटील)